मोठी दुर्घटना टळली : कोपरगावात पाण्याची टाकी कोसळून दोघेजण जखमी | पुढारी

मोठी दुर्घटना टळली : कोपरगावात पाण्याची टाकी कोसळून दोघेजण जखमी

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चांदगव्हान येथे ग्रामपंचायतची जीर्ण झालेली पिण्याच्या पाण्याची टाकी पाडताना ती अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या टाकी शेजारीच आरो प्लांट आहे. तेथे नेहमी पाणी भरण्यास गर्दी असते, मात्र सुदैवाने कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, ठेकेदार घटनास्थळावरून गायब झाल्याचे नागरिकांनी सांगितले. चांदगव्हाण येथे ग्रामपंचायतची पाण्याची जुनी जीर्ण टाकी पाडून, नवी टाकी बांधण्यात येणार होती. यासाठी जुनी टाकी पाडण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सुरू होते. अचानक पाण्याच्या टाकीचा काही भाग जेसीबीवर कोसळल्याने जेसीबी चालक सचिन मधुकर गीते (रा. जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव) हा जेसीबीच्या कॅबिनमध्ये दबला.

नागरिकांसह पोलिस व नगर पालिका अग्निशामक दलाने 1 तास अथक प्रयत्न करीत कटरने जेसीबीची केबिन कापून चालकास सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत जेसीबी चालकासह आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला. जखमी चालकाला अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारास ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

ही दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याने दिसते. टाकी पाडण्यास ब्रेकर मशीनऐवजी जेसीबीचा वापर केल्याने ही दुर्घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

सोलापूर : करमाळ्यात अंगावर विज पडुन १ ठार, २ शेळया १७ कोबंड्याचा मृत्‍यु

पिंपरी शहरात जोर‘धार’; रस्त्यावरून पाण्याचे लोट, चेंबर तुंबले

पिंपरी : पुरस्कार सोहळ्यामुळे मान्यवरांचे दर्शन घडते

Back to top button