

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विजेचा लपंडाव होत असून, महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणच्या अधिकार्यांना दिले.
कुकडी व सीना प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे काही आवर्तने जामखेड तालुक्याला मिळतात. कुकडीच्या पाण्याचा लाभ तालुक्यातील बर्याच गावांना होत असतो. याबरोबरच उजनी जलाशयातील फुगवट्याच्या पाण्याचा लाभ व भीमा आणि सिना नदीकाठच्या अनेक गावांना होतो.
परंतु मागील काही दिवसांपासून विजेचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध असलेले पाणीसुद्धा पिकांना देण्यासाठी अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने वीज पुरवठा नियमित व पुरेशा दाबाने उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी. तसेच सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वीजपुरवठा दिवसा किमान दहा ते बारा तास सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, मोहन पवार, सुंदर बिरंगळ, प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, रमेश आजबे, हरिभाऊ आजबे, अमित जाधव, नरेंद्र जाधव, शरद शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा