अहमदनगर : महापालिका कर्मचार्‍यांना ‘सातवा’ कधी? | पुढारी

अहमदनगर : महापालिका कर्मचार्‍यांना ‘सातवा’ कधी?

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, अहमदनगर महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. महापालिकेने तत्काळ सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी अहमदनगर महापालिका कामगार युनियन गांधीजयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रायलय लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी गुरुवारी (दि. 31) महापालिकेत दिला.

सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकाळी महापालिकेत कर्मचार्‍यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, सरचिटणीस कॉ. आनंद वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, राहुल साबळे, अकिल सय्यद, नंदकुमार नेमाणे, बाळासाहेब राशिनकर, कार्याध्यक्ष गुलाब गाडे यांच्यासह पदधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिका कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीचे लाभ देण्यात आलेला नाही. शासनाचे हे धोरण भेदभावाचे आहे. राज्यातील इतर महापालिकांच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीपेक्षा कित्येक प्रमाणात जास्त असतानाही सावता वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

अहमदनगर महापालिकेने केवळ आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासन निर्धारित टक्केवारीपेक्षा जादा असल्याचे कारण देऊन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्‍यांना नाकारण्यात आल्या. मध्यंतरीच्या काळात शासनामार्फत अहमदनगर महापालिकेतील कामगारांना सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मनपाला संभाव्या उत्पन्नाबाबतच्या उपाययोजनाचा अहवाल मागविला होता. हा अहवाल देऊन सहा महिने झाले तरी अद्याप शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.

त्यावर तत्काळ राज्य शासनाने निर्णय घ्यावा. लाड समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी न केल्यास तो गुन्हा ठरविण्यात यावा. सफाई कामगारांच्या मालकी हक्कचे व घरकुल योजना नव्याने सक्तीचे धोरण जाहीर करण्यात यावे. घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत करावा आदीसह 17 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, कामगारांनी मागण्यासंदर्भात महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले.

हेही वाचा

अहमदनगर : मारहाण करणार्‍यांना अटक करा; अन्यथा कामबंद

सिंधुदुर्गात परजिल्ह्यातील शिक्षकांना शाळेत रूजू होऊ देणार नाही! : अमित सामंत

रुईछत्तिशी : 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना अधांतरीच?

Back to top button