रुईछत्तिशी : 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना अधांतरीच? | पुढारी

रुईछत्तिशी : 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना अधांतरीच?

रुईछत्तिशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना आज अधांतरी राहिली की काय, याची चर्चा रंगू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकण्यात आला. अधिकारी यांनी डोंगरमाथ्यावर जाऊन याची पाहणी केली; पण आज ही योजना कोणत्या अवस्थेत आहे, सर्व्हे किती पूर्ण झाला, सर्व्हेसाठी आमदार, खासदार यांनी किती फॉलोअप घेतला, कोणत्या अधिकार्‍यांनी सर्व्हे केल्याची नोंद सरकारकडे केली, याची चर्चा 35 गावांतून सुरू आहे.

गेल्या महिन्यापासून या भागात दुष्काळाचे वादळ घोंघावते आहे. साकळाई योजनेला विरोध करणारी पुण्यातील राजकारणी मंडळी देखील सरकारमध्ये सहभागी झाली, आता या भागातील शेतकर्‍यांची वक्रदृष्टी साकळाई योजनेकडे लागली आहे. भीमा नदी खोर्‍यातील शेतकर्‍यांना कधीच दुष्काळ जाणवत नाही. याच भीमा नदी खोर्‍यातील पाणी साकळाई योजनेतून नगर, श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांतील शेतकर्‍यांना मिळावे यासाठी ही योजना गेल्या 30 वर्षांपासून पुढे आली.

राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरित्या ही योजना मार्गी लावावी यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. आंदोलनानंतर सरकारने या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकून मान्यता दिली. सर्व्हेच्या हालचाली सुरू झाल्या; पण योजना गतिमान होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊले उचलली जात नसल्याने या भागातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. या जिरायती पठारी भागाला हे पाणी लवकर उपलब्ध झाले तर या भागातील शेतकर्‍यांची सिंचन समस्या मार्गी लागणार आहे. जिरायती भागाला वरदान ठरणारी ही योजना सरकारच्या अजेंड्यातून वारंवार दुर्लक्षित होते. सध्या खरिपाची पिके पूर्णपणे कोलमडून चालली असताना कोणत्याही प्रकारचे हक्काचे पाणी या भागात नाही. त्यामुळे या योजनेची आता नितांत गरज जाणवू लागली आहे.

पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती सधन होण्यासाठी शेतकर्‍यांनी पुन्हा वज्रमूठ बांधणे गरजेचे आहे. आपल्या हक्काचे पाणी मिळवायचे असेल तर आता साकळाई उपसा सिंचन योजनेवर मदार ठेवली पाहिजे. हीच जनजागृती झाली पाहिजे. आगामी काळात नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांनी निवडणूक पार्श्वभूमीवर एल्गार पुकारला पाहिजे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत झालेल्या घोषणा पूर्णत्वास गेल्या पाहिजेत यासाठी या भागतील शेतकर्‍यांनी पुन्हा जागे होण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

कोळपेवाडी : आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नको : आ. काळे

Seema Haider : सीमा हैदरला बुलावा बिग बॉसचा? १७ व्या सीझनमध्ये दिसणार?

UPI Transaction : ऑगस्टमध्ये रेकॉर्डतोड UPI व्यवहार, १० अब्जांचा आकडा पार

Back to top button