लवंगी मिरची : आनंद गगनात मावेना..!

काय सांगू मित्रा! इतका आनंद झाला आहे ना की, दिवाळी, दसरा या सणांच्या काळात होणार नाही इतका आनंद झाला आहे. त्याचं कारण सांगू? गॅस सिलिंडर चक्क दोनशे रुपयांनी स्वस्त झालाय. गॅस सिलिंडर महाग झाला की, ‘गृहिणींचे बजेट कोलमडले’, ‘जनसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया’, ‘वाढत्या महागाईसाठी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले’ अशा बातम्या सुरू व्हायच्या. गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याच्या बातमीला प्रतिसाद मिळाला नाही असे दिसत आहे. काय कारण असेल?
अरे, सवयीचा भाग असतो. शिवाय सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा आपण भारतीय लोकांवर इतका विचित्र परिणाम झालाय की काय सांगू? म्हणजे कुठलीही गोष्ट सकारात्मक रितीने घेण्याची आपली सवय हरवून चालली आहे. याने त्याच्यावर टीका करायची, त्याने याच्यावर टीका करायची, त्याने याच्यावर कोट्या करायच्या, याने त्याला उत्तर द्यायचे, त्याने त्याला प्रत्युत्तर द्यायचे, हे सर्व सुरू असताना चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणार नाही तर काय होईल? हे सर्व करणारे कोण, तर तथाकथित मध्यमवर्ग! म्हणजे महिनाभर चालणारा गॅस दोनशे रुपयांनी महागला, असे म्हणणारे लोक चित्रपटासाठी दिवसाला हजार रुपये आणि विविध हॉटेल्समधून खाद्यपदार्थ मागवण्यामध्ये तीन हजार रुपये खर्च करत असतात. तुझा विश्वास बसणार नाही; पण आजकाल शहरांमध्ये स्वयंपाकघर नसलेली, म्हणजे किचन नसलेली घरे तयार होत आहेत. अरे हसतोस काय? गॅस महाग होत आहे म्हणून असे करत नाहीत ते. त्यांना घरी स्वयंपाकच करायचा नाही. मग, अशा लोकांचा आणि गॅसच्या महागाईचा काय संबंध येतो?
का रे पण किचनच नाही म्हणजे कसं होत असेल कल्पनाही करू शकत नाही. आपली भारतीय संस्कृती किचनमध्येच बहराला येते. आई छान छान स्वयंपाक करते आणि नवर्याला आणि मुलांना पोटभर जेऊ घालते, हे आपल्या भारतीय संस्कृतीचे चित्र गेली वर्षानुवर्षे तसेच अबाधित आहे; पण किचनच नाही म्हणजे कसे काय होणार? मलाच काळजी वाटायला लागली आहे.
अरे, सोपे आहे. अशा घरांमध्ये नवरा-बायको अशा दोनच व्यक्ती राहतात. या दोन्ही व्यक्ती सकाळी उठून आपापल्या कंपनीत कामाला जातात. तिथेच नाश्ता करतात, दुपारचे जेवण करतात आणि संध्याकाळी दोघेजण मिळून एका ठिकाणी भेटून रात्रीचे डिनर करूनच घरी परत येतात. मग, यांना कशाला पाहिजे किचन?
अरे पण, सुट्टीच्या दिवशी तर लागेल ना? शनिवार-रविवार सुट्टी असते. त्या दिवशी काय करणार?
अशी जोडपी सुट्टीच्या दिवशी गावात नसतातच. ही गावाबाहेर निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या रिसॉर्टवर मुक्कामी गेलेले असतात. तिथून रविवारी रात्रीचे जेवण करूनच ते घरी परत येतात आणि सोमवारी सकाळी पुन्हा कंपनीमध्ये कामासाठी जातात. यांचा किचनशीच संबंध येत नाही, तर गॅस सिलिंडरशी कधी संबंध यावा?
असे कसे म्हणतोस यार? किमान कधीतरी चहा करावा लागत असेल, कधीतरी कुरड्या-पापड्या तळून खाण्याची इच्छा होत असेल. पावसाळी हवामानात गेलाबाजार कांदा-भजे खाण्याची इच्छा होत असेल. अशावेळी काय करायचं?
अरे सोपं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी यंत्रे आहेतच ना! म्हणजे बघ, चहा-कॉफीची मशिन आहे. काही तळण्या-भाजण्यासाठी ओव्हन आहे, शिवाय झालं तर कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन आहे आणि भांडे घासण्यासाठी पण मशिन आहे.