बळीराजा पुन्हा 4424 कोटी हरला! 4 लाख शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेत | पुढारी

बळीराजा पुन्हा 4424 कोटी हरला! 4 लाख शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेत

गोरक्ष शेजूळ

अहमदनगर : अवकाळीमुळे रब्बी हातातून गेल्यानंतर कोलमडलेला शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा उठला. बँकेचे उंबरठे झिजवून त्याने पुन्हा खरिपाची स्वप्ने रंगवली. 100 कोटींचे बियाणे आणि 15 कोटींचे खते खरेदीसाठी याच बळीराजाने जिल्ह्यातील 22 बँकांकडे जमिनी गहाण ठेवून तब्बल 4424 कोटींचे कर्ज उचलले. मात्र दुर्दैवाने तीन महिने उलटली तरी अद्याप पावसाचा थेंब नाही. पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत. दुबारपेरणीचा तर केव्हाच विषयच संपला आहे, पुढे पाऊस झाला तरी उत्पादन शक्य नाही. त्यामुळे आता डोक्यावरील हा कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा, या चिंतेत सापडलेले जिल्ह्यातील 4 लाख शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने पंतप्रधान मोदींकडे पाहताना दिसत आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून नैसर्गिक संकटाबरोबरच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर तसूभरही कमी झालेला नसून तो वाढताच आहे. 2019 च्या कर्जमाफीनंतर शेतकर्‍याला खर्‍याअर्थाने नवी संजीवनी मिळाली होती. भविष्यात आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळाला, तर शेती व शेतकरी कधीही अडचणीत येणार नाही, अशीच भावना होती. त्यानंतर तीन वर्षे जिल्ह्यात पाऊसही चांगला झाला, धरणे भरली, मात्र पिकांना कधीही हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे उत्पादन आणि खर्च याचे गणित कधी जुळले नाही आणि परिणामी शेतकर्‍यांच्या जमिनीवर पुन्हा कर्जाचा बोजा पुन्हा वाढू लागला.

रब्बीसाठी 2065 कोटींचे कर्ज उचलले

गेल्यावर्षी रब्बी हंगामात सुमारे तीन लाख शेतकर्‍यांनी जिल्ह्यातील 22 बँकाकडून 2065 कोटींचे कर्ज उचलले होते. मात्र त्या वेळी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची पाठ सोडली नाही. त्यामुळे गहू, कांदा यासह कपाशी, हरभरा या पिकांचे कुठे अवकाळी पावसामुळे तर कुठे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले.

गतवर्षीची नुकसानभरपाईही कागदावरच!

रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी, अतिवृष्टी व सततच्या पावसातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन वर्ष होत आले तरी अद्याप भरपाई शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. शासनाच्या अशाच धोरणांमुळे आजही शेतकरी ‘केवायसी’तच अडकडून ठेवल्याचे दिसते आहे.

सांगा, खरिपाचे कर्ज फेडायचे कसे?

गतवर्षी रब्बीसाठी 2065 कोटींचे कर्ज काढून पिकविलेली पिके अवकाळीत पाण्यात गेली, त्यानंतर आता खरिपासाठी 4 लाख 4 हजार 121 शेतकर्‍यांनी संबंधित 22 बँकाकडून 4424 कोटींचे कर्ज काढून पिके घेतली आहेत.

फुलगळ; वाढही खुंटली

आज सोयाबीन, मूग, उडीदाची फुलगळ झाली आहे, कपाशीची वाढ खुंटली आहे, इतर पिकांचीही दयनीय अवस्था आहे. जर चार-आठ दिवसांत पाऊस झाला तरीही आता उत्पादनात घट निश्चित आहे. त्यामुळे खरीप हातातून निसटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

पीकविम्याचे अग्रिम देण्यास विलंब

21 दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या मंडलात पिकविम्याच्या 25 टक्के रक्कम अग्रिम देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. फक्त मंडल ठरविले जात असून, अद्याप शेतकर्‍याला अग्रिम रक्कम मिळालेली नसल्याचेही समजत आहे.

कोरोना मृतांची कर्जमाफी कागदावरच

मध्यंतरी राज्य शासनाने कोरोनात मृत झालेल्या व्यक्तींच्या नावे काढलेले कर्ज माफ करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी सर्व सहकारी सोसायट्या, पतसंस्थांकडून मयतांच्या कर्जाची आकडेवारी बोलाविण्यात आली होती. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

..तर शेतकर्‍यांची पोरं जाब विचारतील : खेवरे

आज जिल्ह्यातील चार लाख शेतकर्‍यांनी खरिपासाठी कर्ज घेतले आहे. मात्र आता तीन महिन्यांपासून पावसाची वाट पाहून-पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यातील पाणीदेखील आटले आहे. मात्र दुर्दैवाने याकडे शासनाचे लक्ष पोहोचत नाही. शासनाने केवळ कागदे रंगविण्यापेक्षा तत्काळ शेतकर्‍यांना कर्जमाफी करून दिलासा द्यावा, अन्यथा शेतकर्‍यांची मुले तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला.

शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा : डॉ. नवले

गेल्या 122 वर्षांमधील सर्वांत कोरडा ऑगस्ट महिना म्हणून या वर्षीच्या ऑगस्टची नोंद झाली आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज संपूर्णपणे माफ करून, तसेच पीकविम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खाती वर्ग करावी. तसेच पुढील निर्वाहासाठीही ठोस मदत करून सध्याचे सरकार खरोखरच शेतकर्‍यांच्या मागे उभे असल्याची प्रचिती करून द्यावी. याकामी सरकारकडून दिरंगाई किंवा कुचराई झाल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.

कोणत्या बँकाने किती शेतकर्‍यांना दिले कर्ज
जिल्हा बँक 3,09,135 2446 कोटी
स्टेट बँक 36,886 912 कोटी
बँक ऑफ महाराष्ट्र 14,924 250 कोटी
सेंट्रल बँक इंडिया 9567 165 कोटी
युनियन बँक 8234 163 कोटी
बँक ऑफ बडोदा 11496 125 कोटी
बँक ऑफ इंडिया 2479 53 कोटी
कॅनरा बँक 466 23 कोटी
इंडीयन बँक 220 84 लाख
इंडीयन ओव्हरसीस 1246 14 कोटी
पंजाब नॅशनल बँक 1093 27 कोटी
युको बँक 425 54 लाख
पंजाब बँक 173 26 लाख
अ‍ॅक्सिस बँक 963 69.40 कोटी
फेडरल बँक 286 7.13 लाख
एचडीएफसी 3513 53.28 कोटी
आयसीआयसी 1122 17.70 कोटी
आयडीबीआय 772 39.50 कोटी
कोटक महिंद्रा 122 47 लाख
रत्नाकर 35 57 लाख
येस बँक 89 16.55 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण 875 12.05 कोटी

हेही वाचा

Neeraj Chopra : नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले

पुण्यातील गोल्ड बॉय रिलस्टारकडून सराईताने उकळली खंडणी; बदनामी करण्याची दिली धमकी

पुण्यातील गोल्ड बॉय रिलस्टारकडून सराईताने उकळली खंडणी; बदनामी करण्याची दिली धमकी

Back to top button