धक्कादायक! अहमदनगरमध्ये तहसीलदारांचा गळा दाबून जमिनीवर पाडले; वहिवाट रस्त्याचा वाद | पुढारी

धक्कादायक! अहमदनगरमध्ये तहसीलदारांचा गळा दाबून जमिनीवर पाडले; वहिवाट रस्त्याचा वाद

नेवासा फाटा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वहीवाटीचा बंद केलेला रस्ता खुला करण्याचे आदेश देणार्‍या तहसीदारांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. नेवासा फाटा येथे आज बुधवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बंद केलेला रस्ता खुला करून मिळावा यासाठी पाच/सहा कॉलनीतील शेकडो नागरिकांनी नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.
करणसिंह घुले, सत्यजित घुले (दोघे रा. नेवासा खुर्द), ज्ञानेश्वर वसंत घुले (रा. दहिगावने, शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न झालेले तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनीच पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तारा पार्क, साईतेज कॉलनी, फाटके कॉम्लेक्स, शांती नगर अशा पाच कॉलनी नगर-संभाजीनगर महामार्गालगत आहेत. मुकुंदपूर गट नंबर 80/3/अ मध्ये एन.ए मंजूर आहे. हा गट नंबर करण घुले यांच्या मालकीचा आहे. घुले यांनी त्यामधून जाणारा रस्ता बंद केला म्हणून त्या विरोधात कॉलनीतील शेकडो नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले. पोलिस पथकासह तहसीलदार हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. मुकिंदपूरचे सरपंच सतीश दादा निपुंगे तेथे होते. आंदोलकांची समस्या समजावून घेत तहसीलदार बिरादार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यास गेले. आंदोलकही त्यांच्यासोबत होते. तलाठी अण्णा दिघे यांनी रस्ताकेस संदर्भात पंचनामा सुरू केला.

या दरम्यान घुले बंधू तेथे आले. ले आऊट रस्ता खुला होईपयर्ंंत बंद केलेला रस्ता तातडीची गरज असल्याचे समोर आल्याने तो खुला करण्याचे तोंडी आदेश तहसीलदार बिरादार यांनी दिले. ‘ही जागा आमच्या मालकीची आहे. त्यातून रस्ता द्यायचा नाही, कसे, काय रस्ता देता, ते बघतोच, असे म्हणून तिघे घुले बंधू तहसीलदारांच्या अंगावर धावून आले. त्यांनी धक्काबुक्की केली. करणसिंह व सत्यजित घुले यांनी जीवे मारण्याच्या हेतूने तहसीलदार बिरादार यांचा गळा दाबून त्यांना खाली पाडले. तहसील कर्मचारी व पोलिसांनी बिरादार यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. तहसीलदार संजय बिरादार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी करणसिंह, सत्यजित व ज्ञानेश्वर घुले या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • न्याय मिळावा यासाठी नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात शेकडो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे चारही बाजूने दोन ते तीन किलो मीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
  • सरपंच सतीश दादा निपुंगे, बाळासाहेब ठोंबरे, संभाजी पठाडे, सुहास वंजारे, पी. आर. जाधव यांनी तीव्र भावना व्यक्त करताना रस्ता खुला करून मिळावा अशी आग्रही भूमिका घेतल्याने वातावरण तापले. महिलाही आक्रमक झाल्या होत्या.
  • सुनिल जाधव, सचिन पठाडे, शिवा माळवदे, बाळासाहेब ठोंबरे, अमोल घोडके, भास्करराव लिहीनार, बाळासाहेब केदारे, बन्सी आगळे, किशोर गव्हाणे, जनार्दन औताडे, रावसाहेब तुपे, पंजाबराव चांदगुडे, दिपक पवार, ज्ञानदेव गुंड, योगेश पंडुरे, काळे छबुराव, संजय आगळे, दत्तात्रय औताडे, बाळासाहेब भोरडे, दिगंबर पुंड, दत्तात्रय पुंड, ज्ञानेश्वर पुंड, हरी पुंड, ज्ञानेश्वर मोटकर, सुहास वंजारे, विजय साळवे, प्रदिप राजगीरे, भाऊसाहेब कोतकर, सचिन काळे, अनिल पठाडे, शिंदे केतन, किरण चौधरी,अश्विन केळगेंद्रे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
  • विस्तार अधिकारी संतोष कदम, ग्रामसेवक संतोष खंडागळे, कोतवाल शिवाजी गोरे, कामगार तलाठी स्वीटी तळपे घटनास्थळी तहसीलदारांसमवेत उपस्थित होते. तलाठी आण्णासाहेब दिघे यांनी रस्त्याचा पंचनामा करत नागरिकांना वाचून दाखवला. नागरिकांना वहिवाटीचा रस्ता तात्पुरता खुला करण्यात येईल. पक्का रस्ता नियमानुसार व कागदांची पडताळणी करूनच पक्का रस्ता तयार होईल असे सांगितले. मात्र घुले बंधू यांनी ‘रस्ता खुला करून देतात तर आम्हाला तहसीलदार बिरादार यांनी लेखी द्यावे अशी आग्रही भूमिका धरली. लेखी देत नसल्याने त्याचे रूपांतर तहसीलदार आणि घुले बंधू यांच्यात धक्काबुक्कीत झाले.
  • पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, गोपनीय शाखेचे जयवंत तोडमल, श्याम गुंजाळ, महिला पोलीस नाईक सविता उंदरे, सुषमा जाधव या पोलीस कर्मचार्‍यांनी गर्दी पांगवली. घुले बंधू व तहसीलदार बिरादार यांना नेवासा पोलिस ठाण्यात आणले.

तलाठी व कोतवाल संघटनेचे गुरुवारपासून ‘काम बंद’ आंदोलन

आजपर्यंत वाळू तस्करांकडून तहसीलदारांवर हल्ला झाल्याचे अनेकदा घडले. मात्र वहिवाटीच्या रस्त्यावरून तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेचा निषेध करत आरोपींना अटक करावी यासाठी गुरुवारी (दि. 31)पासून नेवासा तहसील कार्यालयातील कर्मचारी, कामगार तलाठी, कोतवाल बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन करणार असल्याची माहिती तलाठी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सोपान गायकवाड, जिल्हा संघटक अनिल गव्हाणे, तालुकाध्यक्ष बद्रीनाथ कमांदर यांनी दिली.

हेही वाचा

नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित, १२ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

हिंगोलीत घरफोडी, चोरट्यांनी २.३५ लाखांचा ऐवज पळविला

बेळगावात तरुणाचा दगडाने ठेचून खून

Back to top button