नगर : बोधेगावमध्ये तीन तास ठिय्या | पुढारी

नगर : बोधेगावमध्ये तीन तास ठिय्या

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : बोधेगाव ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी जि. प. सदस्य नितीन काकडे, माजी चेअरमन महादेव घोरतळे, ग्रामपंचायत सदस्य फिरोजखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिरा समोरील मैदानात पोलिस दूरक्षेत्राजवळ ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.29) तीन तास ठिय्या आंदोलन केले.
तालुका पुरवठा निरीक्षक विजय चव्हाण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा बोधेगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक सचिन भाकरे, विस्तार अधिकारी एम. व्ही. भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव राजेंद्र राजपुरे, पोलिस उपनिरीक्षक गावडे यांच्या लेखी अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सेवा सोसायटीच्या धान्य दुकानात 1 जून 2022 ते आजपर्यंत झालेल्या अपहाराची चौकशी करण्यात आली आहे. दुकानदार ग्राहकांना पावती देत नाही. वजन काटा दर्शनी भागात नसल्याने धान्य कमी दिले जाते. महिन्यातून चार ते पाच दिवस तेही दोन किंवा तीन तासच दुकान उघडे असते. धान्याची परस्पर विल्हेवाट लावली जाते. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे जवळपास सात महिन्यांचे मोफत धान्य वाटप केलेले नाही, असा आरोप करण्यात आला.

तसेच, ग्रामपंचायतीने सन 2007 ते 2017 मध्ये केलेल्या विविध कामांची चौकशी करावी. माजी सरपंच रामजी अंधारे यांच्या गाडीवर 2016 मध्ये झालेल्या गोळीबाराची चौकशी करावी. बोधेगाव परिसरातील सर्व अवैध व्यवसाय, जुगार अड्डे, मटका, गावठी दारू, सेक्स रॅकेट बंद करावेत. रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा. वॉर्ड क्रमांक 3 मधील सिमेंट रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार, ग्रामपंचायत कार्यालय जळीत प्रकरणाची चौकशी करावी. याच कालावधीत अंगणवाडी दुरूस्तीच्या कामात झालेला भ्रष्टाचार, बौद्ध व मातंग समाज स्मशानभूमीत बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामातील भष्टाचार, आठवडे बाजार लिलाव पावतीत झालेला भष्टाचार, कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यात झालेला भ्रष्टाचार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच, बोधेगाव ते बालमटाकळी जुन्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता रहदारीस खुला करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सरपंच सुभाष पवळे, भाजपा अध्यक्ष विश्वनाथ घोरतळे, मयूर हुंडेकरी, ज्ञानेदव घोरतळे, रामजी भोंगळे, मनोहर घोरतळे, संदिपान घोरतळे, शहादेव गुंजाळ, बाबा पठाण, ग्रामपंचायत सदस्य उस्मान कुरेशी, प्रकाश गर्जे, सदानंद गायकवाड, रमजू पठाण, बाबासाहेब घोरतळे, भगवान मिसाळ, प्रमोद मिसाळ, सुंदरनाना काशीद, देविदास घोरतळे, दामोधर भोंगळे, बन्सी मिसाळ, भागवत घोरतळे, बबलू घोरतळे, नशीर सय्यद आदी उपस्थित होते. पोलिस उपनिरिक्षक भास्कर गावंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीची नांदी
नितीन काकडे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचे भाषण म्हणजे दोन महिन्यांनी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीची नांदी ठरले आहे. महादेव घोरतळे यांनी सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करून विधानसभा व लोकसभेसाठी भाजपला उघड मदत करण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा :

धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजविरुद्ध गुन्हा

Pune : सायबर चोरट्याला हरियाणातून बेड्या

Back to top button