पाथर्डी तालुक्यात पावसाची दडी; पिके करपली, नुकसान भरपाई द्या | पुढारी

पाथर्डी तालुक्यात पावसाची दडी; पिके करपली, नुकसान भरपाई द्या

चिचोंडी शिराळ (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सुनपूर्व पाऊस झाला असून थोडाफार पाऊस झाल्याने बळीराजाने खरीप हंगामाची पेरणी केली. याच पावसावर पिकेही जोमात वाढली; आता मात्र पावसाने नेहमीप्रमाणे ताण दिला असून, आता खरीपातील पिके करपू लागली आहेत. पाथर्डी तालुक्यात एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकली आहेत. कापसाची वाढ खुंटली आहे. उडीद, सोयाबीन, मूग, बाजरी दाणे भरण्याच्या अवस्थेत, तर कापूस फुले, पाते बहरत आहेत. खरीप पिकांना ऐन फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना, पावसाने महिनाभरापासून दडी मारली आहे. पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत.

काही पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन ते चार दिवसात पाऊस होईल, या आशेवर शेतकरी होता; मात्र पाऊस काही झालेलाच नाही.
शेतकरी आता पावसाची अतुरतेने वाट पाहत आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत आहे. यामुळे आता प्रशासनाने तत्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करून सरसकट पीकनुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य भानुदास आव्हाड यांनी केली. चिचोंडी, मिरी, शिराळ, कोल्हार परिसरातील शेतकरी संतोष गरूड, अध्यक्ष पोपटराव आव्हाड, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, सरपंच विष्णु गांडाळ, सरपंच रवींद्र मुळे, उपसरपंच राजेंद्र गिते, वैभव गिते आदींनी पिकांचे पंचनामे करण्याची मागीण केली.

बळीराजाची मेहनत व्यर्थ

जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी काळ्या आईची ओटी भरली. पाऊसाचा सततचा लपंडाव सोसत पिके जोमाने शिवरात डौलत होती. उडीद, सोयाबीन, मूग बाजरी दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिके करपली. जलसिंचनाची सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. रोग नियंत्रण व भरघोस उत्पन्नासाठी शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला. सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी उध्वस्त झाला. सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सरसकट आर्थिक मदत करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा

कोपरगाव : एसएसजीएम कॉलेज ‘नॅक’साठी सज्ज! 3 सर्कल पूर्ण

श्रीगोंदा : न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

गणेश मंडळांच्या विधायक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य : चंद्रकांत पाटील

Back to top button