ऑन दि स्पॉट होणार दूध का दूध अन्..! अहमदनगर जिल्हा पथक अलर्ट | पुढारी

ऑन दि स्पॉट होणार दूध का दूध अन्..! अहमदनगर जिल्हा पथक अलर्ट

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दूध भेसळीच्या कारवाईत पथकाने घेतलेले नमुने तपासणीसाठी मुंबई, पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवावे लागतात. तेथून दोन महिन्यांनंतर येणारा अहवाल, त्यातील निष्कर्ष, यावर वेगवेगळ्या चर्चा होतात. मात्र, आता जिल्हा दूध तपासणी पथकाने छापा टाकल्यानंतर त्याच ठिकाणी दुधाचा नमुना घेऊन जागेवरच तपासणी करण्याचा विचार समितीने केला आहे. त्यासाठी नगरच्या आरोग्य प्रयोगशाळेत रिक्त असलेले अन्न विश्लेषक हे पद तत्काळ भरावे, यासाठी जिल्हा दूध तपासणी पथकाचे अध्यक्ष सुहास मापारी व सदस्य सचिव डॉ. वसंत गारुडकर यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन कितीही नाही म्हणत असले तरी दूधभेसळ सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही. मध्यंतरी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमधून दररोज 60 हजार लिटर दूध भेसळीचे तयार केले जात असल्याची धक्कादायक माहिती मांडतानाच, अन्न व औषध प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्यामुळेच आता जिल्हा दूध तपासणी समितीची स्वतंत्र रचना करून त्यात अन्न व औषध प्रशासनासोबतच महसूल, पशुसंवर्धन विभागातील अधिकारीही समाविष्ट केले आहेत.

या समितीचे अध्यक्ष सुहास मापारी, सदस्य सचिव डॉ. वसंत गारुडकर, अन्न व प्रशासनाने कुटे आदींनी कमी अधिक प्रमाणात संकलन केंद्र, प्लॅन्ट यावर छापासत्रे सुरू केली आहेत. मात्र या ठिकाणी घेतलेले दुधाचे नमुने तपासणीसाठी नगरमध्ये सुविधा नसल्याने ते मुंबई, पुणेकडे पाठवावी लागत आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी मोठा विलंब लागतो. तेवढ्यात हे प्रकरणही थंड होते. परिणामी, भेसळखोरांनाही याची कल्पना असल्याने तेही कारवाईला जुमानत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता आता दूध तपासणी समितीने दूध नमुने तपासणी नगरमध्येच केली जावी, यासाठी पावले उचलली आहेत.

भेसळ तपासणी सुविधा नसल्याने मर्यादा!

जिल्ह्यातील दुधात होणार्‍या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत असून, त्यासोबतच दूध भेसळीच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत. नगरमध्ये दूध नमुने तपासणी शक्य नसल्याने कारवाईवर मर्यादा येत असून, प्रयोगशाळेतील अन्न विश्लेषक हे पद भरावे, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

हेही वाचा

संतुलित द़ृष्टिकोनाची गरज

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कधी थांबवणार?

Jayakwadi Dam : मुळा-भंडारदर्‍यावर पुन्हा जायकवाडीची वक्रदृष्टी; नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची नामुष्की

Back to top button