खर्ड्यामध्ये कडकडीत बंद; बाजार समिती संचालकांना मारहाणीचा निषेध | पुढारी

खर्ड्यामध्ये कडकडीत बंद; बाजार समिती संचालकांना मारहाणीचा निषेध

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : साक्ष देण्याच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना गुरूवारी न्यायालयाच्या आवारातच दोघांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने पुकारलेल्या खर्डा बंदला नागरिक व व्यापार्‍यांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन बाजारपेठ बंद ठेवली होती. खर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच पती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना दोघांकडून न्यायालयाच्या आवारातच लोखंडी टामीने मारहाण करण्यात आली. या घटनेचा 24 ऑगस्ट रोजी भाजपाकडून निषेध करण्यात आला. दि.25 ऑगस्ट रोजी खर्डा शहर बंद करण्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार जामखेड यांना देण्यात आले होते.

अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मारहाण करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, यासाठी शुक्रवारी खर्डा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खर्डा गावातील छोटे मोठे व्यावसायिक, कापड दुकाने, किराणा व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांसह इतर सर्व लहानमोठी दुकाने व्यापार्‍यांनी बंद ठेवली होती. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी व मित्र मंडळांनी गाव बंद ठेवलेे. खर्डा येथील सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांनी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात; कोळगावात दुष्काळाचे सावट

विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ

अहमदनगर : खरीप ’मातीत’ तर रब्बीवर दुष्काळाचे ’मळभ’

Back to top button