चिंताजनक! पाणी, चाराटंचाईने दूधउत्पादक संकटात; नगर तालुक्यातील चित्र

चिंताजनक! पाणी, चाराटंचाईने दूधउत्पादक संकटात; नगर तालुक्यातील चित्र

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव परिसरात महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिकांसह ऊस, मका ही चारापिके धोक्यात सापडली आहेत. पावसाअभावी पाण्याचे उद्भवही कोरडेठाक पडल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. चारा व पाणीटंचाईने दूध उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे.

वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी आदी परिसरात पावसाने दांडी मारल्याने जनावरांच्या चार्‍याबरोबरच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. शेतकर्‍यांना जनावरांसाठी लागणार्‍या चार्‍यासाठी अन्य घटकांवर किंवा विकतच्या चार्‍यावर अवलंबून राहावे लागत आहे. चार्‍याचे भाव वाढल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाणीटंचाई अन् चारा दरवाढीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. कडबा कुट्टी, भुसा, सरकी पेंड, गोळी पेंड, मका, गव्हाचे कणी, हत्ती गवत, ऊस, कडबा आदींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.

जनावरांच्या चार्‍याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय संकटात सापडला असून यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. नाही तर दूध व्यवसाय संपल्याशिवाय राहणार नाही

– संदीप भापकर, डेअरी चालक, गुंडेगाव

पावसाने दडी मारल्यानेे चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा चारा आणायचा कुठून हा प्रश्न शेतकर्‍यापुढे निर्माण झाला आहे. या संदर्भात कृषी, महसूल विभागांच्या माध्यमातून प्रशासनाला लवकरच अहवाल देण्यात येईल.

– संतोष भापकर,
उपसरपंच, गुंडेगाव

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news