चिचोंडी पाटील : शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव | पुढारी

चिचोंडी पाटील : शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव

बाळासाहेब गदादे

चिचोंडी पाटील (नगर ) : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टरांची बदली झाली असून, त्यातील एक डॉक्टर बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. तर, दुसरे डॉक्टर रजेवर गेल्याने संपूर्ण रुग्णालयाचा कारभार एका महिला डॉक्टरवर आला आहे. त्यामुळे रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. बदली झालेल्या डॉक्टरांच्या जागी नवीन डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. चिचोंडी पाटीलचे शासकीय रुग्णालय हे तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात अनेक सुविधांपासून नागरिक वंचित आहेत.

हे रुग्णालय योग्यरित्या सुरू केल्यास व या रुग्णालयात डॉक्टर, नर्स यांचा स्टाफ पूर्ण भरल्यास नागरिकांना याचा फायदा होईल व उपचारही वेळेवर मिळतील. नगर-जामखेड महामार्गावर अनेकदा अपघात झालेल्या रुग्णांना तातडीची सेवा मिळत नाही. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयात जावे लागते. यातून अनेकदा उपचारासाठी रुग्णालयात जाईपर्यंत वेळ लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे तातडीने या शासकीय रुग्णालयात सुविधा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

एक्स-रे मशीन धूळखात पडून
चिचोंडी पाटील येथील या शासकीय रुग्णालयात शासनाकडून डिजिटल एक्स-रे मशीन देण्यातर आले आहे. मात्र, मशीन चालविण्यासाठी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे हे मशीन अक्षरश: धूळखात पडून आहे.

एकाच डॉक्टरला चोवीस तास ड्युटी?
या शासकीय रुग्णालयात एकाच प्रभारी डॉक्टरची ड्युटी लागली आहे. एकच डॉक्टर चोवीस तास ड्युटी कशी करू शकतात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक याची दखल का घेत नाहीत, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

हेही वाचा : 

Onion News : सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

पुढील महिन्यात दुर्बिणीशिवायच दिसणार धूमकेतू!

 

Back to top button