संगमनेरमध्ये पाऊस नसल्याने पिके कोमजली | पुढारी

संगमनेरमध्ये पाऊस नसल्याने पिके कोमजली

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू झाल्यानंतर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला. त्या पावसाच्या भरवश्यावर संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र काही दिवस चाललेला रिमझिम पाऊस मात्र गेल्या महिन्यापासून हवामान तज्ञांचे अंदाज फोल ठरवत पाऊस गायब झाल्याने तालुक्याच्या पठार भागासह तळेगाव निमोण भागातील खरिपाच्या पिकांनी माना टाकत पिके जळू लागल्यांचे दिसत आहे.

चालू वर्षी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यात सुरुवातीला रिमझिम. मात्र आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी रिमझिम पावसातील कमी ओलीवर खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र गेल्या एक महिन्यापासून आकाशात नुसतेच ढग दाटून येतात. पाऊस पडण्याचे वातावरण तयार होते, चोरदार पाऊसही होईल असे वाटते. मात्र पाऊस काही पडायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतातील उभी पिके पावसा अभावी डोळ्या देखत जळण्यास सुरुवात झाली आहे. जर खरीप वाया गेला तर शेतकरी खर्‍या अर्थाने आर्थिक संकटात सापडेल असे चित्र निर्माण झाले आहे.

आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल या आशावर बळीराजा दररोज चातका प्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांच्या हाती घोर निराशा आली आहे. शेतकरी चांगलाच हावलदिल झाला आहे. दरवर्षी पावसाचा तंतोतंत अंदाज देणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी संगमनेरात येऊन वर्तविलेला अंदाज फोल ठरला आहे.

हेही वाचा

केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लावणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील वीजबिल थकल्याने 860 अंगणवाड्या अडचणीत

Back to top button