शेवगाव : ठेकेदार एजन्सीला काळ्या यादीत टाका | पुढारी

शेवगाव : ठेकेदार एजन्सीला काळ्या यादीत टाका

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-भगूर रस्ता अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना शारीरिक व्याधी उद्भवत असून, वाहनांचेही नुकसान होत आहे. तीन महिने होऊनही रस्त्याच्या कामास विलंब होत असल्याने संबंधित ठेकेदार एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. तिसगाव-शेवगाव-पैठण राज्यमार्ग 61 मधील शेवगाव बसस्थानक ते भगूर रस्त्याच्या कामाला विशेष दुरूस्ती कार्यक्रम 2019-20 अंतर्गत मंजुरी मिळून पाच ते सहा महिने झाले आहेत.

किलोमीटर 22/ 300 ते 25/ 300, असे 2 कोटी 75 लाख रूपये खर्चाच्या या कामाचा शुभारंभ दि.8 मे रोजी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाला. खडीकरण व डांबरीकरणाचे हे काम मे.मनिष इन्फ्राकॉन प्रो.प्रा.लि. एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप कामास सुरुवात झाली नसल्याने प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

बसस्थानक ते गाडगेबाबा चौकापर्यंत असणार्‍या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यावरून प्रवास कसा करावा, असा प्रश्न पडत आहे. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्याने रस्त्याने प्रवास करताना दुचाकी चालकांचे मणके खिळखिळे होत आहेत. अनेक वाहने मोडकळीस आली आहेत. पावसात काम करता येत नाही, अशी पळवाट काढली जात आहे. परंतु, जवळपास महिन्यापासून पावसाची उघडीप असताना या रस्त्याचे काम सुरू होत नाही. अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

आमदार मोनिका राजळे यांनी एका कार्यक्रमात दर्जेदार काम न करणार्‍या व कामास विलंब करणार्‍या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. शेवगाव ते भगूर रस्ता दुरूस्तीस दोन-तीन महिन्यांपासून विलंब होत आहे. त्यामुळे सदर एजन्सीला काळ्या यादीत टाकून दुसर्‍या एजन्सी मार्फत त्वरित या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

हेही वाचा

केसरी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी

कोपरगाव कारागृहाचे रूपडे पालटणार

 

Back to top button