अकरा महिन्यांनंतर बुमराहची गोलंदाजी | पुढारी

अकरा महिन्यांनंतर बुमराहची गोलंदाजी

डबलिन : वृत्तसंस्था तब्बल 11 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जसप्रित बुमराहने बुधवारी कसून सराव केला आणि यावेळी पूर्वीचीच तडफही दाखवून दिली. 29 वर्षीय बुमराहने यापूर्वी गतवर्षी 25 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात शेवटचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर तो पाठदुखीमुळे बाहेर फेकला गेला व नंतर त्याला शस्त्रक्रियादेखील करवून घ्यावी लागली. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा असेल, असे जाहीर करण्यात आले.

भारतीय संघ मंगळवारी उशिरा आयर्लंडमध्ये दाखल झाला आणि अधिक वेळ न दवडता त्यांनी दुसर्‍याच दिवशी सराव सत्रात उतरणे पसंत केले. ‘बीसीसीआय’ने बुमराह गोलंदाजी करत असतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात बुमराह पूर्वीच्या तडफेने एकापेक्षा एक बाऊंसर टाकत असल्याचे दिसून आले. भारतीय संघात या मालिकेकरिता बुमराहसह प्रसिद्ध कृष्णाचा समावेश असून, तो ही प्रदीर्घ कालावधीनंतर संघात परतत आहे.

Back to top button