नगर : बोगस बियाण्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

नगर : बोगस बियाण्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान
Published on: 
Updated on: 

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी हतबल झाले असतानाच बोगस बियाणांमुळे शेतकर्‍यांना लाखोंचा फटका बसल्याचा प्रकार कामरगाव येथे घडला. कोबी पिकासाठी चार लाखांचा आर्थिक खर्च करणार्‍या शेतकर्‍याला बियाणेच बोगस निघाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बोगस बियाणे देणार्‍या कंपनीवर कारवाई करीत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. कामरगाव येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव दत्तू ठोकळ यांनी त्यांच्या गट नंबर 105 मध्ये एक हेक्टर क्षेत्रात 85 हजार गुड्डी बॉल कोबी वाणाची कलमे लावली.

कोबीसाठी लागणारी आवश्यक खते व औषधांची फवारणी केली. यासाठी त्यांनी चार लाखांचा खर्च केला. साधारणपणे 80 ते 85 दिवसांत कोबी पिकांची वाढ होऊन विक्रीसाठी उपलब्ध होतात. मात्र, ठोकळ यांच्या शेतातील कोबीची तीन महिन्यांतही पोषित फळधारणा झाली नाही. त्यातच आलेली फळे कुपोषित निघाली. साधारपणे दीड ते दोन किलो वजनाचे होणारा कोबीचा गड्डा तीन महिन्यानंतरही केवळ 200 ते 400 ग्रॅम वजनाचा झाला.बियाणांबाबत फसवणूक झाल्याने त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली.

कृषी विभागाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठाशी संपर्क साधला. उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर यांच्यासह कृषी विद्यापीठाचे संशोधन अधिकारी डी.पी.पाटील, डॉ. राजेंद्र गेठे, प्रा. अन्सार खान आत्तार, कृषी पर्यवेक्षक बाळसाहेब आठरे, प्रतिभा राऊळ, गुणनियंत्रण निरीक्षक एन.के.ढेरंगे यांनी ठोकळ यांच्या कोबी प्लॉटची पाहणी केली. ठोकळ यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले.

ढोकळ यांनी कोबीचे बियाणे वापरलेल्या कंपनीचे बियाणे संतोष ढवळे, विलास ठोकळ यांनी शेतात वापरले. त्यांच्याही कोबीची समांतर पाहणी करण्यात आली. रॅन्डम पद्धतीने पाहणी केली असता, अपेक्षित फळधारणा झाली नसल्याचे व कुपोषित फळे असल्याचे कृषी अधिकार्‍यांना आढळून आले. कृषी अधिकार्‍यांनी कंपनी प्रतिनिधी व शेतकर्‍यांचें म्हणणे ऐकून घेत, विद्यापीठ संशोधनकडे अहवाल येणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच तुकाराम कातोरे, माजी चेअरमन पोपट साठे, विलास ठोकळ, सुनील ठोकळ, संतोष ढवळे, गणेश पाचरे, रमेश पाचरे, संदीप कोल्हे, सूरज ठोकळ उपस्थित होते.

… तर न्यायालयात जावे लागेल
दरवर्षी कोबीचे उत्पादन घेतो. या वर्षी एक हेक्टर क्षेत्रात कोबीची लागवड केली. यातून सरासरी 80 ते 85 टन उत्पादन निघून 8 ते 9 लाख रुपये मिळण्याची मोठी आशा होती. त्यामुळे चार लाखाचा खर्च केला. मात्र बियाणेच बोगस निघाल्याने खर्च वाया गेला. कंपनीने नुकसान भारपाई न दिल्यास न्यायालयात जावे लागेल, असा इशारा शेतकरी वसंतराव ठोकळ यांनी दिला.

शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर कोबीची शेतात जाऊन पाहणी केली. तक्रारीत तथ्य आढळून आले.बियाण्यात दोष आढळून आल्यास कंपनीचा परवाना रद्द करण्याचा विचार करू.
                                                -पोपटराव नवले, उपविभागीय कृषी अधिकारी 

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news