काशीनाथ दातेंची भाजपशी सलगी ! पारनेरच्या राजकारणात उलथापालथ

काशीनाथ दातेंची भाजपशी सलगी ! पारनेरच्या राजकारणात उलथापालथ

पारनेर : राज्यात कोण सत्तेत आणि कोण विरोधात, याचा थांगपत्ता राज्यातील जनतेला लागत नाही. तशीच काहीशी राजकीय उलथापालथ पारनेर तालुक्यात होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते यांची भाजपशी सलगी वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसत आहे. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आहेत. तर, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस हे प्रमुख विरोधक आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके सध्या अजित पवार गटासोबत आहेत. तर, माजी आमदार विजय औटी हे शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. मात्र, त्यांचे सहकारी असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते सर यांची राजकीय भूमिका काही दिवसांपासून बदललेली दिसत आहे.

औटींपासून दुरावत त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी सलगी केली आहे. तर, त्यांचेच टाकळी ढोकेश्वर गटातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे विधानसभा निवडणुकीपासून खासदार डॉ.सुजय विखे यांच्यासोबत होते. बाजार समिती व खरेदी विक्री संघ निवडणुकीत त्यांनी विखे गटाला साथ दिली. पालकमंत्री विखे नुकतेच पारनेर दौर्‍यावर असताना झावरे यांनी त्याकडे पाठ फिरविली. मात्र, त्यांचे समर्थक विखेंच्या स्वागताला उपस्थित असल्याने, झावरे यांची भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. अशातच दाते यांनी विखे यांच्यासोबत हजेरी लावल्याने, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच विधानसभा निवडणुकीसाठी ते विखेंचे उमेदवार असतील का, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

आमदार लंके व खासदार विखे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. मात्र, आता दोघेही सत्ताधारी गटात असल्याने संघर्षाची धार काही अंशी कमी झाली आहे. तरीही खासदार विखे तालुक्यात आमदार लंके यांना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला सुजित झावरे यांना सोबत घेतले. मात्र, सध्या ते तटस्थ आहेत. आता, काशिनाथ दाते हे विखे यांच्या संपर्कात आहेत. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनीही आमदार लंके यांच्यापासून फारकत घेत सवता सुभा निर्माण केला आहे. त्यांचीही विखे कुटुंबाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्रांनी तालुक्यात बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार-सुजित झावरे बैठक?
आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिल्याने, शरद पवार यांनी पारनेरमध्ये चाचपणी सुरू केली आहे. पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीला साथ दिलेले व मध्यंतरी दुरावलेले सुजित झावरे यांच्यासोबत शरद पवार यांची बैठक झाल्याची चर्चा आहे. तेव्हापासून झावरे हे विखे पिता-पुत्रापासून दुरावल्याचे दिसून येत आहे.

आमदार लंके विरोधकांची मोट
पारनेर बाजार समिती निवडणुकीत आमदार लंके व माजी आमदार विजय औटी हे एकत्र आले. त्यामुळे आमदार लंके यांना फारसा विरोध उरला नाही. मात्र, त्यांनी खासदार विखे यांनाच दक्षिण मतदारसंघातून आव्हान दिले होते. त्यामुळे खासदार विखे यांनी तालुक्यात त्यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news