अहमदनगर : जातेगाव घाटात चार बिबट्यांचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण | पुढारी

अहमदनगर : जातेगाव घाटात चार बिबट्यांचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेल्या जातेगाव येथील घाटात चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जातेगावचे सरपंच रविराज गायकवाड व त्यांचे सहकारी सुशिल सखाराम गायकवाड हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले असता रात्री दीड ते दोनच्या सुमारास जातेगावच्या घाटात त्यांना चार बिबट्या आढळून आले. हे बिबटे दिघोळकडून मुंगेवाडी डोंगरात जाताना दिसले.

जातेगाव घाट हा वन विभागात असल्यामुळे व बालाघाटच्या डोंगररांगा असल्यामुळे हे बिबटे , हिंस्र प्राणी सर्रास वावर दिसून येतात. मध्यंतरी याच गतवर्षी या बिबट्यांनी नायगाव येथे दोन वानर व चार वासरांना हमला करून ठार केले होते. यानंतर काही बिबटे खर्डा किल्ला परिसरात दिसून आले. खर्डा व परिसरात बिबट्यांचा सततचा वावर असल्याने जनावरे चारण्यासाठी व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सद्यस्थितीत पावसामुळे चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी डोंगर माथ्याकडे जनावरे चारण्यासाठी जात असतात. परंतु, या बिबट्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गतवर्षी वनविभागाने पिंजरे लावले होते. परंतु, एकही बिबट्या पिंजऱ्यात पडला नव्हता. परंतु, काही महिन्यांपूर्वी मोहरी येथे एक बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे जातेगाव व खर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीचे अथवा दिवसा एकटे बाहेर न जाता काळजी घेऊन फिरावे, असे आवाहन जातेगाव सरपंच रविराज गायकवाड यांनी केले.

पिंजरा लावून लवकरच बिबटे जेरबंद करू – वनपरिक्षेत्र आधिकारी मोहन शेळके

जातेगाव व खर्डा परिसरात बिबट्या आढळण्याचे समजते. दोन दिवस बिबट्याच्या पायाचे ठसे बघून त्या भागात पिंजरा लावून लवकरच बिबटे जे बंद करणार असल्याचे मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत जामखेड यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button