हुतात्मा पोलिस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार वेतन | पुढारी

हुतात्मा पोलिस कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार वेतन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही वेतनाचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासाठी हुतात्मा पोलिसांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणारे त्यांचे वृद्ध आई-वडील तसेच अविवाहित, दिव्यांग बहीण-भाऊ आणि अल्पवयीन पाल्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पुनर्विवाहित पत्नींना घ्यावी लागणार आहे.

नक्षलवादी दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी, दरोडेखोरांविरोधी कारवाया तसेच कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेले अधिकारी किंवा पोलिसांच्या विधवा पत्नीला शासनाकडून संबंधित हुतात्म्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत नियत वेतन दिले जाते. मात्र, पुनर्विवाह केल्यानंतर हुतात्म्यांच्या पत्नीचे हे वेतन बंद करण्यात येते. त्यामुळे राज्यातील अनेक हुतात्मा पत्नी व कुटुंबीयांनी याबाबत तक्रार करत सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता अशा विधवा पत्नीस कुटुंबीय या नात्याने दिवंगत अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत वेतन देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना मृत झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पुनर्विवाह केलेल्या विधवांना तरतुदींप्रमाणे संपूर्ण वेतनाचा लाभ मिळणार आहे.

Back to top button