

नगर: पुढारी वृत्तसेवा : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका असली तरी त्यात डिझेल नाही. धामोरी उपकेंद्रात नर्सने प्रसुती केली, पण अतिरक्तस्त्रावाने विवाहितेचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून झालेल्या सहा तासांच्या हेळसांडीत बाळ सुखरूप असले तरी अदिवासी महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. रेणुका किरण गांगुर्डे (रा. कारवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रेणुका ही कारवाडी येथील अशोक राणू वाघ यांची मुलगी आहे. दुसर्या बाळंतपणासाठी ती माहेरी कारवाडी येथे आली होती. 3 ऑगस्टला प्रसुती कळा सुरू झाल्याने तिला चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.
तेथून तिला कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी तिच्या वडिलांनी रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र त्यात डिझेल नसल्याचे कारण देण्यात आले. रुग्णवाहिका चालकाने कसेतरी डिझेल आणले, मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाऐवजी वाटेतच असलेल्या धामोरी उपकेंद्रात तिला दाखल केले. धामोरी उपकेंद्रात अत्यावश्यक साधने नसतानाही नर्सने तिची प्रसुतीचे धाडस दाखविले. प्रसुती होवून तिने बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुती काळात अतिरक्तस्त्राव झाला. त्यामुळे तेथून तिला पुन्हा चासनळी केंद्रात नेण्याचा निर्णय झाला, तेथे पोहचेपर्यंत तिची प्रकृती खालावली होती. त्यानंतर तिला ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातलगांनी केला आहे.
डॉक्टरवर कारवाईची मागणी
सरकारी यंत्रणेच्या निष्क्रिय कारभारामुळे रेणुकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दोषी अधिकार्यांवर कारवाईची मागणी करत शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी, तसेच नवजात बालकाच्या पोषणाची जबाबदारी निश्चितसाठी संबंधितांची पगारकपात करावी, अशी मागणी केली आहे.
आधी उघड्यावर प्रसूती, आता तर थेट मृत्यू
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमके वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात, असा नेहमीचा अनुभव रुग्णांना येतो. डॉक्टर नसल्याने आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची उघड्यावरच प्रसुती झाली होती. आता तर डॉक्टरअभावी अदिवासी महिलेला जीव गमवावा लागला. संबंधित अधिकार्यांवर काय कारवाई होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमके काय घडले !
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीला आहेत. विवाहिता पहाटे सहा वाजेच्या दरम्यान केंद्रात पोहचली, पण तेथे दोन्ही डॉक्टर उपस्थित नव्हते. नर्सही नगरला प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. तिच्या नातलगांनी डॉक्टरांशी संपर्क साधला, पण त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेत डिझेल नव्हते. गावातील पेट्रोलपंप अगोदरच्या दिवशी बंद होता. तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप यांना ही माहिती समजली. त्यांनी रुग्णवाहिका चालकास दरडावत तातडीने रुग्णवाहिकेतून कोपरगावला येण्याचे आदेश दिले.
वाटेतच धामोरी उपकेंद्रात रुग्णवाहिका वळली. तेथील नर्सने बाळंतपण करण्याची तयारी दर्शविली. 9.45 वाजता तिने कन्येला जन्म दिला. नर्स लसीकरणाच्या कामात व्यस्त झाल्या, त्यामुळे रक्तस्त्राव सुरूच राहिला. आरडाओरड झाल्याने घाबरलेल्या नर्सने तातडीने चासनळी केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क केला. डॉक्टरांनी विवाहितेला पुन्हा चासनळीला घेवून येण्याचे सांगितले. प्रकृती खालावल्याचे पाहून चासनळीच्या डॉक्टरांनी तिला ग्रामीण रुग्णालयात पाठविले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
चासनळी आरोग्य केंद्रात महिलेला प्रसूतीसाठी नेले होते. त्या ठिकाणी डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे त्या महिलेला धामोरी उपकेंद्रात नेले होते. तेथे डिलिव्हरी झाली; मात्र रक्तस्राव अधिक झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य केंद्रावर अनुपस्थित असलेल्या डॉक्टरवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारीमाणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का? रुग्णवाहिकेत डिझेल नाही, तर रुग्णालयात डॉक्टर नाही. कोपरगाव तालुक्यातील चासनळी केंद्रावरील आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे एका गर्भवतीला जीव गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. माझी राज्य शासनाला विनंती आहे, की या घटनेला जबाबदार असणार्या सर्वांवर कारवाई व्हावी.
– सत्यजित तांबे, आमदार, विधान परिषद
हेही वाचा :