पीकविम्यासाठी शेतकर्यांची लूट

चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षीच्या पीकविमा मंजुरीबाबत शासनाने केवायसी अपडेट करण्याचे आदेश दिल्यानंतर हे केवायसी मोफत अपडेट करण्याच्या सूचना नगर तालुका तहसीलदारांकडून देण्यात आल्या. यात गावांगावांत सेतू चालकांकडून व दुसर्या सेत ूकार्यालयाचा आईडी वापरून शेतकर्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ज्या गावांमध्ये सेतू कार्यालय नाही, अशा ठिकाणी खासगी एजंटांकडून केवायसी करून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. केवायसी करण्यासाठी प्रत्येकी शेतकर्यांकडून पन्नास रुपये ते शंभर रुपये उकळण्याचा प्रकार नगर तालुक्यात घडल्याचे बोलले जात आहे.
तलाठी व सर्कल यांनी केवायसी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते. परंतु तलाठी व सर्कलच गैरहजर असल्याने सूचना देणार कोण? हा मोठा प्रश्न आहे यासंदर्भात चिचोंडी पाटील येथील तलाठी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता.
नगर तालुक्यात यापूर्वीही अनेक सेतू कार्यालयाकडून शासनाच्या नियमा व्यतिरिक्त रक्कम उकळण्याचे प्रकार सुरू आहेत आधार, पॅन कार्ड किंवा रेशन बाबत कुठल्याही तक्रारी किंवा दुरुस्तीसाठी नागरिकांना दोन ते तीन वेळा बोलावून प्रत्येक वेळी पैशाची मागणी काही सेतू कार्यालयाकडून केली जाते. नगर तालुक्यातील तलाठी, अधिकार्यांनी सेतू कार्यालयांना योग्य त्या सूचना देणे आवश्यक असतानाही हेच तलाठी नेमून दिलेल्या सजेच्या ठिकाणावरून गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.
तक्रार केल्यास कारवाई : तहसीलदार
नगर तालुक्यातील ज्या शेतकर्यांकडून केवायसीबाबत पैसे उकळण्यात आले आहेत. अशा शेतकर्यांनी तक्रार करावी. संबंधित सेतू चालकावर तत्काळ कारवाई केली जाईल, असे तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :