छत्रपती संभाजीनगर | व्हिएतनामच्या १३ कंपन्यांची डीएमआयसीला भेट; लॉजिस्टीकमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक, ऑरिकची हायटेक सुविधा भावली | पुढारी

छत्रपती संभाजीनगर | व्हिएतनामच्या १३ कंपन्यांची डीएमआयसीला भेट; लॉजिस्टीकमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक, ऑरिकची हायटेक सुविधा भावली

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हिएतनाम येथील लॉजिस्टीक आणि वेअरहाऊस क्षेत्रातील १३ कंपन्यांच्या शिष्टमंडळाने शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीची पाहणी केली. डीएमआयसीतील हायटेक पायाभूत सुविधांसह जागेचे दर पाहून शिष्टमंडळाने गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. लवकरच पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या कंपन्यांच्या प्रमुखांकडून सांगण्यात आल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे.

व्हिएतनाम येथील १३ लॉजिस्टीक उद्योग देशभरात गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणी दौरा करत आहे. हे १८ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी सायंकाळी शहरात आले होते. गुरुवारी त्यांनी शेंद्रातील आॉरिक सिटीला भेट दिली. यावेळी राज्याचे उद्योग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एनआयसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजतकुमार सैनी, एमआयटीएलचे सरव्यवस्थापक दत्ता भडकवाड, ऑरिकचे अधिकारी महेश शिंदे यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने ऑरिकची पाहणी करून दोन कंपन्यांना भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे अनुभव जाणून घेतले. ऑरिकमधील औद्योगिक वातावरण, उपयुक्तता, पायाभूत सुविधांची उपलब्धता यावर सविस्तर केली

दरम्यान, ऑरिक हॉलला भेट दिल्यानंतर संभाव्य आंतरराष्ट्रीय संवाद केंद्राचे मॉडेल दाखविण्यात आले. तसेच यामुळे काय फायदा होणार आहे, परदेशी उद्योगांसाठी ऑरिक कसे चांगले ठरेल याची माहिती राज्यातील अधिकाऱ्यांनी सादर केली. तसेच डीएमआयसी व उद्योग विभागातर्फे राज्याच्या उद्योग क्षेत्राचे सादरीकरण करण्यात आले. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली गेली. डीएमआयसीचे लॉजिस्टिकबाबत असलेले लवचिक धोरण, व्हिएतनामनच्या उद्योगांकडून या क्षेत्रासाठी गुंतवणूक केल्यास त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती रजतकुमार यांनी दिली. हर्षदीप कांबळे यांनी महाराष्ट्राचे उद्योग क्षेत्रातील बलस्थान सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिएतनामनच्या शिष्टमंडळाने भेटीनंतर समाधान व्यक्त केले.

लॉजिस्टीक-वेअरहाऊससाठी उत्सुक

शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीमध्ये लॉजिस्टीक पार्कसाठी मंजूरी मिळाली आहे. तसेच व्हिएतनामच्या या १३ कंपन्या याच क्षेत्रातील असल्याने त्यांना देशातील इतर औद्योगिक परिसरापेक्षा डीएमआयसीतील हायटेक सुविधा भावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे.

कर्नाटक, गुजरातचाही दौरा

व्हिएतनामचे हे शिष्टमंडळ ऑरिकची पाहणी केल्यानंतर कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर गुजरातमध्येही पाहणी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रामुख्याने तीन प्रमुख क्षेत्रांत ऑरिकमध्ये गुंतवणूक होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

Back to top button