पुणे : शंभर रुपयांसाठी खून करणार्‍या भाच्याला अटक | पुढारी

पुणे : शंभर रुपयांसाठी खून करणार्‍या भाच्याला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकत्र काम केल्यानंतर मजुरीचे शंभर रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणातून भाच्याने मामाच्या डोक्यात लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी भाच्याला कोंढवा पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे.
सचिन राम एलनवाड (वय 25, रा. हनुमाननगर, पिसोळी; मूळ रा. खानापूर, नांदेड) असे त्याचे नाव आहे. तर, सचिनने केलेल्या मारहाणीत मामा अनंत शंकरराव काळगीरे (वय 45, रा. हनुमाननगर, पिसोळी) यांचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.

हा प्रकार घडल्यानंतर काळगीरे यांचा मुलगा हनुमंत (वय 23, रा. रामनगर, रहाटणी) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, भाचा सचिन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाचा सचिन आणि मामा अनंत हे दोघे एकत्र मजुरीचे काम करीत होते. काम केल्यानंतर त्यातील अर्धे पैसे सचिनने मामाकडे मागितले होते.

त्याला त्यांनी नकार दिला. त्या कारणातून दारू पिऊन सचिनने मामा अनंत यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. दरम्यान, सचिन हा आपल्या मूळ गावी नांदेड येथे पळून गेला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, कर्मचारी सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, सागर भोसले, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग होणार सुरक्षित; सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांची माहिती

पुणे : साखर संग्रहालय हलविण्याच्या हालचाली?

लवंगी मिरची : फाटाफूट..!

Back to top button