

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : सायबर गुन्ह्यांचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले. श्री आनंद महाविद्यालयात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावरील आयोजित चर्चासत्रात मुटकुळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शेषराव पवार, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलिस गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, प्रा.डॉ.अनिल गंभिरे, डॉ. प्रतीक नागवडे, प्रा. डॉ.धीरज भावसार,प्रा.अनिता पावसे उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक मुटकुळे म्हणाले, इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठे आक्रमण केले आहे.
इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरूपयोग, सर्वसामान्यांचे जीवन, राष्ट्राची व्यवस्था, अर्थव्यवस्था डळमळीत करू शकतो. इंटरनेटद्वारे केल्या जाणार्या गैरवापरास 'सायबर क्राईम' म्हटले जाते. तेव्हा, अशा ऑनलाईन गुन्हेगारीपासून आपण सावध राहिले पाहिजे. धीरज भावसार यांनी प्रास्ताविक केले. अनिता पावसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. इस्माईल शेख यांनी आभार मानले.
अनोळखी व्यक्तींशी मैत्री नको
मुुलींनी अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावरून फ्रेंडशीप करू नये. हल्लीचे तरूण फिल्टर लाऊन मोबाईल अॅपद्वारे मुलींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सुंदर फोटो टाकून त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवितात. अशा गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला मुटकुळे यांनी दिला.
हेही वाचा :