वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेची आठवण ताजी असतनाच, जांब येथील प्राथमिक शाळेची धोकादायक भिंत व छत कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील जांब येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या दोन खोल्या सुमारे 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. त्या दोन्ही खोल्या धोकादायक झाल्याने, त्या निर्लेखित करून तेथे नव्या दोन खोल्या मंजूर कराव्यात, याबाबत ग्रामस्थ, तसेच तत्कालीन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यातील एक खोली निर्लेखित करण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे ती पाडण्यातही आली होती. त्यामुळे एकाच खोलीत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी बसत होते.
रविवारी (दि.30) रात्रीच्या सुमारास अचानक एका खोलीचे छत व भिंत कोसळली. भिंतीचे दगड व छताचे पत्रे खोलीत पडले. सोमवारी ( दि.31) सकाळी ही बाब निदर्शनास आली. नगर तालुक्यातील निंबोडी येथे काही वर्षांपूर्वी शाळेची भिंत अंगावर कोसळून तीन विद्यार्थी मयत झाले होते. त्या घटनेसारखीच ही घटना घडली. मात्र, या ठिकाणी रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती संदीप गुंड, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके, शिवाजी पवार, आजिनाथ पवार, हनुमान पवार, भाऊ नारळे, चांगदेव पवार, कांतीलाल पवार, गंगाधर पवार, दीपक पवार, विशाल कोहोक, अच्युत पवार, विकास कोहोक आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, एकमेव शाळा खोलीही पडल्यामुळे ही शाळा उघड्यावर आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी शेजारी असलेल्या दोन खासगी खोल्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे.
..तर जिल्हा परिषदेत आंदोलन : कार्ले
जांब येथील शाळा रात्रीच्या वेळी पडल्याने सुदैवाने निंबोडीची पुनरावृत्ती टळली आहे. अशीच धोकादायक इमारत तालुक्यातील सारोळा बद्धी शाळेचीही झाली आहे. या शिवाय इतरही धोकादायक शाळा खोल्या आहेत. त्या तातडीने निर्लेखित करून नव्याने शाळा खोल्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे शिवसेनेच्या वतीने करणार असून, त्यावर तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा संदेश कार्ले यांनी दिला.
पालकमंत्र्यांचा 'कोतवाल' फक्त श्रेय लाटण्यात मग्न
निंबोडी दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी व ग्रामस्थांनी शिर्डीला पायी मोर्चा नेला होता.त्यावेळी शिर्डी संस्थानने 30 कोटी रुपयांचा निधी शाळा खोल्यांसाठी मंजूर केला; मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील 10 कोटी ही अजून खर्च केले नाहीत. निवडणुका लांबल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे जनहिताची कामे रखडली आहेत. राज्यातले हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, त्यातच पालकमंत्र्यांनी नगर तालुक्यात एक कोतवाल नेमला आहे, त्याला या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, फक्त दुसर्यांच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोपही संदेश कार्ले यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केला.
हेही वाचा :