पारनेर : पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : आमदार नीलेश लंके

पारनेर : पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : आमदार नीलेश लंके

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाले असून, पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार नसल्याने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. त्यावर मुंडे यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत.

आमदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन पीक विम्यासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणींबाबत अवगत केले. त्यांनी तसे निवेदनही मुंडेंना दिले आहे. निवेदनात नमुद केले की, या वर्षी महराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणून राज्यात राबविण्याचा निर्णय 26 जून रोजी घेतला. यंदाच्या खरीप हंगामापासून ही योजना राज्यात लागू झाली असून, त्यासाठी दि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीची 2025 सालापर्यंत नेमणूक करण्यात आली. या योजनेत नगर जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, भात, मका, कांदा, कापूस व सोयाबिन आदी पिकांचा तालुकानिहाय व महसूल मंडल निहाय समावेश करण्यात आला आहे.

कापूस व कांदा पिकासाठी विमा हप्ता पाच टक्के असून, इतर पिकांसाठी दोन टक्के आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांकडून प्रति पीक अर्ज फक्त एक रूपया विमा हप्ता भरून घेण्याबाबत सुचित केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी सभासदांना 31 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली; मात्र जिल्ह्यात अत्यल्प पाऊस, पेरणीचे प्रमाण कमी, दुबार पेरणीचे संकट यांमुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नसल्याने या योजनेस 15 दिवसांची मुदवाढ देण्याची मागणी आमदार लंके यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news