

मढी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी ताालुक्यातील श्री. क्षेत्र मढी येथे गर्भगिरी डोंगरावर वन विभागाने दहा हेक्टरवर दहा हजारांहून अधिक विविध जातींची वृक्षलागवड केली होती. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केल्याने या हिरवाईने गर्भगिरी फुलला आहे.
वनपरिक्षेत्र अंतर्गत गट नंबर 99 मध्ये भरीव वनीकरण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी सुमारे 12 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यात करंज, सीताफळ, वावळा, चिंच, सिसू अशा विविध जातीच्या रोपांची लागवड केली. वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाडाचे संरक्षण करून पाण्याची योग्य नियोजन करत तिसगाव वन विभागाने झाडांचे जतन केले.
या परिसरात जनावरांना चराइबंदी करीत वनविभागाने पूर्ण मेहनत घेऊन झाडाचे संवर्धन केले. वन परिमंडल अधिकारी वैभव गाढवे, वनरक्षक एकनाथ खेडकर, वन कर्मचारी विष्णू मरकड, गणेश पाखरे, अशोक कुसारे, समीर मोमीन यांनी परिश्रम घेतले. गर्भगिरी डोंगरावर व परिसरात वन विभागातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. वृक्षलागवड केल्यानंतर नियोजन करून ती झाडे जगविली जातात. त्यामुळे मायंबा व मढी परिसर मोहून टाकतो.
वन विभागानेे रोपवाटिका तयार करून त्यामध्ये करंज, चिंच, आवळा, कांचन, अंजन, साग, वावळा, लिंब, शिवण आदी झाडांची रोपे तयार केली. गर्भगिरी डोंगरावर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून चाळीस हजारांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितले.
हेही वाचा