कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शुद्ध प्रकाशात सेवन करण्यासाठी केलेला प्रसाद म्हणजे काला. ज्या भोजनात प्रसन्नता आहे, त्याला प्रसाद म्हणतात. काला हे ऐक्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. कोल्हार भगवतीपुर येथे मोठ्या भक्तीमय चैतन्य व मंगलमय वातावरणात पार पडलेल्या ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथेची सांगता रविवारी महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटपाने झाली. कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश या ओवीचे निरूपण रामगिरी यांनी काल्याचे किर्तन प्रसंगी निरूपण केले शनिवारी संध्याकाळी महाराजांनी कथेचे सातवे पुष्प गुंपले. यात श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीचा प्रसंग त्यांनी सांगितला, तर रविवारी दुपारी काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता झाली.
रामगिरी यांनी यावेळी आयुर्वेदातील दाखला देत मंडूक मनीचे उदाहरण देताना सांगितले, जमिनीत तीन परसाच्या खाली काही बेडूक असतात, त्या बेडकाच्या मस्तकात मंडूक मनी असतो. सर्पदंश झाल्यावर विष उतरवण्यासाठी हा मनी वापरला जातो. शिंपल्यातही मनी असतात, मोती पवळा असे अनेक मन्याचे प्रकार आहे. तसा कृष्णमणी हा स्वयंप्रकाशित मणी आहे. कृष्ण मनी हा अदृश्य प्रकाश प्रकाशित करतो, असे सांगून जो आपल्या भक्ताच्या चित्ताच्या आकर्षण करतो, तो कृष्ण, तो भगवंत, परमात्मा भक्ताला पाप मुक्त करतो. पाकशास्त्र हे मोठे शास्त्र आहे. स्वयंपाकाचे चार गुण आहे, आहाराचा शरीरावर मनावर परिणाम होता. तो शुद्ध आहार व सात्विक आहार सेवन केल्यास मनुष्याचे विचारही चांगले राहतात असे त्यांनी सांगितले.
गेली सात दिवस कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थांनी रात्रंदिवस अथक मेहनत घेऊन हा भागवत सप्ताह यशस्वी पार पाडला. आज काल्याच्या किर्तनाला उच्चांकी गर्दी होती. भगवतीपुर ग्रामस्थांच्या वतीने महंत रामगिरी महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, भगवान महाराज डमाळे, मधु महाराज कडलग आदींचा सत्कार करण्यात आला.
डॉ. भास्करराव खर्डे व कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी मनोगत व्यक्त करीत सप्ताहासाठी विशेष परिश्रम घेणार्या सर्वांचे आभार मानले. वैजापूर येथे 21 ऑगस्टपासून गंगागिरी महाराज यांच्या सप्ताह सोहळा सुरू होत आहे, या सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले.
हेही वाचा