पारनेर : जळालेल्या झाडांच्या खड्ड्यात रोपण | पुढारी

पारनेर : जळालेल्या झाडांच्या खड्ड्यात रोपण

शशिकांत भालेकर

पारनेर(अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे 10 हेक्टरवर सुमारे 11 हजार रुक्ष लागवड करण्यात आली; मात्र या झाडांची लागवड फेल ठरली असल्याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने सातत्याने लावून धरले. संबंधित सामाजिक वनीकरणाच्या अधिकार्‍यांनी येथे लक्ष घालत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकारी गणेश गिरी यांच्यावर कारवाई करून याप्रकरणीचा खुलासा मागवण्यात आला असून, यानंतर त्यांचे सर्व अधिकार काढून दुसर्‍या अधिकार्‍यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. जळालेल्या झाडाच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्यात येणार आहे.

मांडवे खुर्द येथे झालेली झाडे लागवड कागदावर केली. वृक्ष लागवडीनंतर फक्त एकदाच त्यांना पाणी घातल्याने हजारो झाडे जळून गेले होते. याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रकाशित केले होते. यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने या डोंगरावर लक्ष घालत जळालेले सर्व झाडे तातडीने पुन्हा लावली. या झाडांची तीन वर्षे काळजी घेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी दोषी असलेल्या वनपाल गणेश गिरी यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यात आपले काम बेजबाबदार करून कर्तव्यात कसूर केली व वरिष्ठांची दिशाभूल केली.

झालेल्या दुर्लक्षित व दिरंगाईच्या कामामुळे रोपे जळून गेली. यात झाडांवर झालेला खर्च वसूल करून कर्तव्य कसूर व वरिष्ठांची दिशाभूल करण्याबाबत आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून क्षेत्रीय कामांचा सर्व कार्यभार इतर कर्मचार्‍यांकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यांच्यावर वनपरीक्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामे करावी, ही कामे करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई, बेजबाबदार पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसे आढळल्यास कारवाईस आपण जबाबदार राहाल, अशा प्रकारची नोटीस त्यांना देण्यात आली.

वन विभागाने घातले लक्ष

मांडवे खुर्द येथे गेल्या जुलै महिन्यात 11 हजार झाडे लावण्यात आली. त्यातील 80 टक्के झाडे जळून गेल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. यानंतर वन विभागाने लक्ष घालून येथे पुन्हा सर्व झाडांची लागवड केली. तसेच, याप्रकरणी जबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करत नोटीस बजावत त्याचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले.

पुढेही राहणार ‘पुढारी’चे लक्ष

झाडे लावल्यानंतर त्यांना पाणी घातले नाही. त्यामुळे झाडे जळून गेली. याप्रकरणी ‘पुढारी’ने लक्ष घालत सातत्याने वृत्त प्रकाशित केले. आज या डोंगरावर सर्व खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष जगविण्याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे. यापुढेही ‘पुढारी’चे लक्ष राहणार असून, ‘पुढारी’च्या या सामाजिक कार्याबाबत मांडवे खुर्द सरपंच, ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा

नागापेक्षाही जहाल विषारी साप!

नगर रोड परिसरातील रस्त्यांची लागली वाट !

शेवगाव : इथेनॉल प्रकल्पाचा काय फायदा? शेतकर्‍यांचा सवाल

Back to top button