वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नगर रोड, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरी, चंदननगर भागातील काही रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कल्याणीनगर येथील गोल्ड अॅडलब चौक, शास्त्रीनगर चौक, वडगाव शेरीतील विद्यांकुर शाळा, सुंदराबाई शाळेसमोर, छत्रपती संभाजी महाराज चौकातील पंपिंग स्टेशन, विमाननगर येथील साकोरेनगर, दत्त मंदिर चौक, गणेशनगर सर्वे नं 48 मधील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगर रोडवरील शिवांजली मंगल कार्यालयासमोर चेंबर तुटल्याने खड्डा तयार झाला आहे. खराडीतील झेन्सार कंपनीसमोरही खड्डे पडले आहेत. परिसरातील रस्त्यांची सध्या वाट लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
वडगाव शेरी आणि चंदननगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यांवर असमतोल निर्माण झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे छोटे, मोठे अपघातही होत असून, वाहतुकीचा वेगही मंदावल्याने वाहतूक कोंडी होत आहे. खड्ड्यांतून वाहने चालवल्यामुळे दुचाकीस्वारांना मणक्याच्या आजारांना समोरे जावे लागत आहे.
मेनहोल्सच्या दुरुस्तीची मागणी
महापालिकेने काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजवले होते. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. कल्याणीनगर आणि विमाननगरमधील अंतर्गत रस्त्यांवरील मेनहोल्समुळे अनेक खड्डे तयार झाले आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे मेनहोल्स त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना आणि इतर कामे केली होती. ही कामे झाल्यानंतर मात्र रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात आली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून वाहने चालवावी लागत असल्याने अनेकांना मणक्याचे आजार होत आहेत.
-वसिम सय्यद, रहिवासी, खराडी