अवैध गौण खनिज माफियांचा धुमाकूळ; जेऊर परिसरात रात्रीस चाले खेळ | पुढारी

अवैध गौण खनिज माफियांचा धुमाकूळ; जेऊर परिसरात रात्रीस चाले खेळ

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जेऊर परिसरात अवैध गौण खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, महसूल विभाग या प्रकाराबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जेऊर पंचक्रोशीत अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुळाट झाला असून, अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतूक संपूर्ण रात्रभर चालू असते. राजरोसपणे माती, मुरूम, पिंपळगाव तलावाजवळून वाळूचा बेबंद उपसा चालू आहे. गौण खनिजाचे उत्खनन होत असताना महसूल अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत नाहीत, हे विशेष.

पिंपळगाव माळवी तलावातून माती, मुरूम, वाळू मोठ्या प्रमाणात उचलण्यात आली आहे. तसेच तोडमलवाडी, बहिरवाडी, ससेवाडी, जेऊर हद्दीत मुरूमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे. गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे. महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने यामागचे गौडबंगाल काय आहे, हे समोर आल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही.

अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी, तसेच मंडलाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. गौण खनिजावर लक्ष ठेवणे हे तलाठ्यांचे आद्य कर्तव्य आहे. गौण खनिजाबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठी यांनी केले पाहिजे. तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गौण खनिजाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्खनन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम देखील तलाठ्यांचेच असते. परंतु, प्रत्यक्षात जेऊर परिसरात महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे.

जेऊर पंचक्रोशीतील काही ठिकाणी नावाला रॉयल्टी भरली जाते. रॉयल्टी भरलेल्या गौण खनिजाच्या कित्येक जादा पटीने उत्खनन होत असताना कारवाई केली जात नाही. रॉयल्टी भरलेल्या जागेवर साधी पाहणी केली जात नाही. यामागे महसूल विभाग कोणते हितसंबंध जोपासत आहे, हे अनाकलनीय आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचे नुकसान होत आहे. ओव्हरलोड आणि सुसाट चालणारी वाहने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच वाहनांवर नंबर नसल्याने अपघात झाल्यास वाहन ओळखणे अवघड होत असते. अवैध खनिज माफियांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून गट-तट पडलेले आहेत.

जेऊर पंचक्रोशीत सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खननाला अधिकार्‍यांचा आशीर्वादअसून, त्याला आर्थिक लागेबांध्याची किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

महसूल अ‍ॅक्शन मोडवर येणार का?

जेऊर पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक झाली आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. महसूल विभागाने अ‍ॅक्शन मोडवर येऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे.

चौकशीचा फार्स नको

जेऊर परिसरातील गौण खनिजाच्या उत्खननााची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशीचा फार्स न करता दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

हेही वाचा

IND vs WI : फलंदाजी क्रमातील प्रयोग पुन्हा होणार का?

कोपरगाव तालुक्यामध्ये एमआयडीसी उभारावी

निसर्गाच्या कोपाने गाडलेल्या माळीणला 9 वर्षे पूर्ण

Back to top button