अहमदनगर : सव्वालाख जनता टँकरच्या पाण्यावर | पुढारी

अहमदनगर : सव्वालाख जनता टँकरच्या पाण्यावर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे दोन महिने जवळपास संपत आले आहे. मात्र, अद्याप दमदार पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील 61 गावे आणि 333 वाड्यावस्त्यांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टंचाई गावांतील जवळपास सव्वालाख जनतेला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी, संगमनेर, नगर, पारनेर, पाथर्डी या तालुक्यांतील काही मोजक्या गावांना एप्रिल, मे महिन्यांत हमखास पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदा देखील एप्रिल- मे महिन्यांत टँकर सुरु झाले. जून महिन्यात पाऊस पडून टँकर कमी कमी होत जातील, असे वाटत होते. मात्र, यंदा जून महिन्यात पावसाने गुंगारा दिला. जुलै महिन्यात देखील पावसाची जवळपास तीच परिस्थिती आहे.

दीड महिन्यांत दमदार पाऊस झाला नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
संगमनेर तालुक्यातील 13 गावे आणि 33 वाड्यांतील 21 हजार 451 लोकसंख्येसाठी 10 टँकर, नगर तालुक्यातील 12 गावे आणि 42 वाड्यांतील 22 हजार 270 लोकसंख्येसाठी 11 टँकर, पाथर्डी तालुक्यातील 7 गावे आणि 69 वाड्यांतील 17 हजार 394 लोकसंख्येसाठी 10 टँकर सुरू आहेत.

पारनेर शहरालाही टंचाईच्या झळा

19 जुलैपर्यंत टंचाईच्या झळा सर्वाधिक पारनेर तालुक्याला बसला आहे.या तालुक्यातील 26 गावे आणि 165 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली. यामधील 51 हजार 284 लोकसंख्येसाठी 21 टँकर धावत आहेत. अकोले तालुक्यात सर्वात कमी 2 गावे आणि 4 वाड्यांत 1 टँकर सुरू आहे.

हेही वाचा

लाभांश की एसडब्ल्यूपी, गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला?

सांगली : बेडग पंचक्रोशीत कडकडीत बंद; बाजारपेठ ठप्प

नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ

Back to top button