अहमदनगर : अन्यथा सक्षम पोलिस अधीक्षक नेमा; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

अहमदनगर : अन्यथा सक्षम पोलिस अधीक्षक नेमा; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यांपासून पोलिस अधीक्षक राकेश ओला हे नियुक्त झाल्यापासून त्यांच्या कार्यकालात जातीय दंगली, तसेच टोळी युद्ध खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह नगर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यासाठी पोलिस अधीक्षक ओला यांनी रस्त्यावर उतरून खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्ह्यासाठी सक्षम पोलिस अधीक्षक तातडीने नेमण्यात यावा, अशी मागणी नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, अमित खामकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यातून मिळणार्‍या भरमसाठ पैशातून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. अशा गुन्हेगारांमुळे जातीय दंगली मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. शहरातील मुकुंदनगर भागात एका मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते.

त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले. शेवगाव तालुक्यात जातीय दंगल झाली. संगमनेर तालुक्यातही त्याचे पडसाद उमटून मोठ्या प्रमाणावर जातीय दंगल उसळली. शहरात रामवाडी, कोठला भागात तसेच माळीवाडा. सूर्यनगर, एम.जी. रोड, कापड बाजार या भागांत जातीयवाद उफाळल्याने व्यापारी व गोरगरीब नागरिकांचे नुकसान झाले.

तसेच, लव्ह जिहादचे प्रकार आणि जातीय धर्मांतराच्या प्रकरणांत वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित नसून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई, तडीपारीची कारवाईही थंड झालेली आहे. शहरात झालेल्या टोळी युद्धामुळे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन युवकांची हत्या झाली. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन हत्या झाल्या आहेत. त्याची अजून उकल झालेली नसल्याने पोलिस प्रशासनाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे.

या घटना दोन महिन्यांमध्ये घडल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक नसल्यानेच या गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा, जिल्ह्यासाठी सक्षम पोलिस अधीक्षक तातडीने नेमण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news