गेवराई घरफोडीतील मुख्य आरोपी जेरबंद | पुढारी

गेवराई घरफोडीतील मुख्य आरोपी जेरबंद

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गेवराई येथे भरदिवसा झालेल्या दहा लाखांच्या घरफोडीप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरट्याचा घटनास्थळी पडलेला मोबाईलच तपासात मुख्य दुवा ठरला आहे. रामेश्वर जंगल्या भोसले (वय 26, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी जि. बीड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला ताब्यात घेतले असून, तीनताशा खडूं काळे व अरूण बापू काळे (रा. बोलेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्याचे दोन्ही साथीदार मात्र पसार झालेले आहेत. घटनास्थळी पडलेल्या मोबाईलमुळे पोलिसांना अवघ्या काही तासातच त्यांचा सुगावा लागला.

गेवराई येथील शिवाजी सतरकर वस्तीवर गेल्या सोमवारी दुपारी घरफोडी झाली. सतरकर व त्यांची पत्नी विजया यांनी जीव धोक्यात घालून चोरट्यास प्रतिकार केला. चोरट्याच्या हातात लोखंडी कटावणी असतानाही प्रथम शिवाजी यांनी चोरट्याशी झटापट केली. तीन मिनिटे हा थरार चालला. याच झटापटीत चोरट्याचा मोबाईल खाली पडला होता. शिवाजी सतरकर यांच्या झटापट झालेल्या चोरट्याचा फोटो मोबाईलला डीपीला असल्याने सतरकर यांनी ओळखले आहे. तिघे चोरटे एकाच दुचाकीवरून गेवराई लगतच्या सुलतानपूर शिवारात कुकाणा मार्गाने चोरटे पळाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते.

अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपअधीक्षक सुनील पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, दत्तात्रय गव्हाणे, उमाजी गावडे, संदीप दरंदले, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, अमोल कोतकर यांच्या पथकाने आरोपीस पकडून नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले.

रामेश्वर भोसले सराईत गुन्हेगार

मुख्य आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, शिलेगाव व नगर जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी, नगर, कर्जत येथे दरोडे, खुनाचा प्रयत्न यांसह विविध दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

अहमदनगर : ते ‘पिस्तूल’ कोणाचे? एकविरा चौकातील गूढ कायम

पुणे : फसवणूक करणार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुण्यात दिवसा घरफोडी करणारी स्वामी टोळी जेरबंद

Back to top button