अहमदनगर : ते ‘पिस्तूल’ कोणाचे? एकविरा चौकातील गूढ कायम | पुढारी

अहमदनगर : ते ‘पिस्तूल’ कोणाचे? एकविरा चौकातील गूढ कायम

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याच्या पंटरांनी उपनगरात दहशत माजवत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अंकुश चत्तर यांची हत्या केली त्याला सहा दिवस उलटले; तोफखाना पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करताना सुमारे दीडशे ते दोनशे फुटांवर पडलेला एक कट्टा (गावठी पिस्तूल) जप्त केला होता. को कट्टा नेमका कोणाचा होता, याचे गूढ अजूनही कायम आहे. ‘कट्टा’ कोणाचा होता, यावर दबक्या आवाजात अनेक चर्चा सुरू आहेत. परंतु, पोलिसांनी अजून अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही.

खुनाच्या कटात सहभागी असलेला मुख्य आरोपी नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे व अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सूरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे व एका अल्पवयीन मुलाला एलसीबीच्या पथकाने 36 तासांत अटक केली होती. तर, राजू फुलारी व अरुण पवार या दोघांना बुधवारी तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली. अटकेत असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

‘मला तुमच्याशी बोलायचे आहे, थोडा वेळ थांबा’, असे म्हणून फुलारी याने एकवीरा चौकात अंकुश चत्तर यांना थांबवून ठेवले होते. त्यानंतर काही वेळात नगरसेवक अंकुश चत्तर व त्याचे पंटर तेथे आले. पुन्हा चत्तर व हल्लेखोरांत वाद सुरू झाला. त्यानंतर चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. तब्बल 35 मिनिटे हल्लेखोर घटनास्थळी होते. डोक्यात काचेच्या बाटल्या, रॉडने मारहाण झाल्याने चत्तर गंभीर जखमी झाले.

त्यानंतर हल्लेखोर वाहनातून घटनास्थळावरून पसार झाले. एकवीरा चौकात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही सिनेस्टाईल राडेबाजी कैद झाली आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणणार्‍या या खुनाच्या घटनेबाबत गूढ कायम आहे. घटनेचे कारण पोलिस शोधत आहेत. तसेच, घटनास्थळावरून मिळालेला ‘गावठी कट्टा’ कोणाचा याचाही तपास पोलिस सुरु आहे.

‘सेक्टर’वरील पोलिस कुठे होते?

वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने प्रभावी पोलिसिंग राबवणे गरजेचे असताना पोलिसांकडून ते होत नाही, असा आरोप सातत्याने होत आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टरवर रात्री व दिवसा ड्यूटीवर असणारे पोलिस कर्मचारी योग्य ड्यूटी करत आहेत का, याची तपासणी होणे गरज त्यामुळे व्यक्त होत आहे. एकवीरा चौकाचा परिसर सेक्टर एक किंवा दोनमध्ये येतो. या चौकात 30 ते 35 मिनिटे बिनधोकपणे राडेबाजी सुरू असताना नाईट ड्यूटीवर असलेले पोलिस कुठे व काय करत होते, हाही प्रश्न विचारला जात आहे.

वर्चस्वाच्या लढाईतून राडेबाजी

उपनगरातील अवैध धंदे, गुन्हेगारीतूनच वर्चस्वाच्या ‘लढाया’ निर्माण होत आहेत. गेल्या दोन महिन्यात वर्चस्वाच्या वादातून काही रक्तपाताच्या घटना घडल्या आहेत. जेव्हा असे तंटे होतात, तेव्हा पोलिसही राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांसोबत नरमाई घेतात. अवैध धंदे चालवून दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारांचे कंबरडे पोलिसांनी मोडण्याची गरज आहे.

हेही वाचा

पुण्यात दिवसा घरफोडी करणारी स्वामी टोळी जेरबंद

पुण्यात दिवसा घरफोडी करणारी स्वामी टोळी जेरबंद

सातारा : पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

Back to top button