

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : बाह्यवळण मार्गामुळे बोल्हेगाव ते निंबळक हा रस्ता कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली.
नगर बाहयवळण रस्त्यावरील निंबळक चौकात उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. कामामुळे जिल्हा परिषद हद्दीतील निंबळक ते बोल्हेगाव रस्ता कायमचा बंद होणार आहे. रस्त्याचा निंबळक व परिसरातील सुमारे 10 ते 12 गावातील शेतकरी, कामगार व व्यावसायिक या रस्त्याचा वापर करतात. तसेच निंबळक ते बोल्हेगाव या रस्त्याच्या बाजूस सुमारे 5 ते 6 हजार लोकसंख्येच्या वस्त्या आहेत. महापलिका हद्द 2 किमी आहे.
प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पी.आ.यू.नगर यांनी निंबळक ते बोल्हेगाव रस्ता बंद करून जो पर्यायी मार्ग सुचविला आहे, तो चुकीचा व गैरसोयीचा आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निंबळक ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा रस्ता बंद न करता या रस्त्यावर भुयारी मार्ग करावा. त्यामुळे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व ग्रामस्थांचा प्रश्न सुटेल.
यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष भाऊराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, लक्ष्मण होळकर, अशोक पवार उपस्थित होते. बोल्हेगाव ते निंबळक रस्त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी पाठपुरावा करून चार किमी रस्त्यासाठी चार कोटी रूपये रुपये मंजूर केले. तसेच, सावली हॉटेल ते निंबळक बायपास चौकापर्यंत डांबरी रस्ता मंजूर झाल्याचे लामखडे यांनी सांगितले.
हेही वाचा