..तर शिक्षकांची ‘बीएलओ’तून सुटका! | पुढारी

..तर शिक्षकांची ‘बीएलओ’तून सुटका!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाच्या सर्वसमावेशक सूचनांमुळे व त्यातील विविध तरतूदींमुळे बीएलओच्या कामातून शिक्षकांना वगळण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी त्वरित या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी केली आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्लीचे मुख्य सचिव अजोय कुमार यांच्या निर्देशानुसार नवीन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या नवीन नेमणुकीबाबत सर्वसमावेशक सूचना ह्या देशस्तरावरून 4 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील सर्व राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकारी यांना पोस्ट व ईमेल द्वारा कळविण्यात आलेल्या आहेत. मात्र सुमारे दहा महिने होऊनही नवीन बीएलओच्या सर्व समावेशक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दुर्लक्ष करत त्यांनी हे महत्त्वपूर्ण निर्देश दडवून ठेवल्याचा आरोप निमसे यांनी केला आहे .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने बीएलओच्या नियुक्तीबाबत भारत निवडणूक आयोग, नवी दिल्लीचे इलेक्ट्रोल विभागाचे कक्ष अधिकारी ललित मोहन यांच्याशी संपर्क साधला होता. मोहन यांनी भारत निवडणूक आयोगाने नवीन बीएलओ यांच्या नियुक्तीबाबतच्या सर्वसमावेशक सूचनांबाबत 4 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना सदर निर्देश पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संघाच्या विनंतीवरून भारत निवडणूक आयोगाच्या ईमेलवरून राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्या ईमेलवर सदर निर्देश 24 मार्च 2023 रोजी पाठविण्यात आले.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 5 एप्रिल रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना समक्ष कार्यालयात निवेदन देवून भारत निवडणूक आयोगाच्या 4 ऑक्टोबर 2022 च्या निर्देशांची त्वरीत अंमलबजावणी करून बीएलओंच्या नवीन नियुक्तीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना अवगत करण्यात यावे. मात्र हे निवेदन देऊन तीन महिने झाले तरीही या निर्देशांची अंमलबजावणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केलेली नाही, असे निमसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

कोल्हापूर : रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद

पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश

ह्दयद्रावक! कोल्हापूरमध्‍ये दुचाकीला अपघात, आईसमोरच बालिकेचा अंत

Back to top button