करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगावात बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणार्या मुलींची छेडछाडीची घटना होत असताना, पोलिसांना वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होता ना दिसत नाही. आता तर या टारगटरांनी थेट वर्गात घुसून विद्यार्थीनींची छेड काढल्याची घटना घडली आहे. यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिसगाव व्यापारी बाजारपेठेचे शहर असून, आता याची ओळख मुलींच्या छेडछाडीचे ठिकाण म्हणून होत चालली आहे. मागील आठवड्यात हनुमान टाकळी येथील दोन मुलींची भर रस्त्यावर तिसगावात एका तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी तिसगावसह परिसरातील तरुणांनी मूक मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली अन् चौकशीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 12) तिसगावातील एका विद्यालयातील इयत्ता अकरावीत शिकणार्या विद्यार्थिनीची जेवणाच्या सुटीत तिच्या वर्गात घुसून छेड काढण्यात आली. छाडछाडीचे हे धाडस तिसगावातील एका टवाळखोर तरुणांने केले. या घटनेनंतर तत्काळ त्या मुलींनी आरडाओरड केला. शिक्षक व विद्यालयातील कर्मचार्यांना बोलावून घेतले.
त्या संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. या घटमुळे तिसगावमध्ये एकच खळबळ उडाली असून, रस्त्यावर किंवा विद्यार्थिनी घरी जाताना त्यांचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार या अगोदर अनेक वेळा घडले आहेत; मात्र आता थेट वर्गात घुसून त्यांची छेड काढण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यापर्यंत टवाळखोर तरुणांचे धाडस वाढले असेल तर अशा टवाळखोरांना कोणी राजकीय स्वार्थासाठी पाठीशी घालत आहे का?, कोणाच्या जीवावर इतके मोठे धाडस त्यांनी केले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अनेक वेळा छेडछाडीचे प्रकार झाल्यानंतर गावातील काही राजकीय नेते पुढे येऊन राजकीय स्वार्थासाठी प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतात. परंतु, अशा मिटवामिटवीमुळे या टवाळखोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
तिसगावमध्ये सातत्याने मुलींची छेड काढण्याचे प्रकार होत असल्याने तिसगावच्या राजकीय नेते मंडळी बद्दल ही आता बाहेरच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ज्या टवाळखोर तरुणाने वर्गात जाऊन मुलीची छेड काढली, त्या सैबाज दिलावर पठाण याच्या विरोधात संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली असून, इतर मुलींबाबत असे प्रकार घडू नयेत म्हणून या टवाळखोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून कुठल्याही प्रकारे या गुन्ह्यात मागे हटणार नाही, अशी भूमिका संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी घेतली. यामुळे या तरुणावर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संबंधिताला अटक नाही
गुरुवारी उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती, असे संबंधित मुलीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. तिसगाव येथे बाहेर गावच्या मुलींना या टवाळखोरांचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. परंतु, प्रकरण काही दिवसांनी मिटवले जात असल्याने या टवाळकरांचे धाडस वाढत चालले आहे.
हे ही वाचा :