रेखा जरे हत्याकांड : वकिलांना साधायचाय आरोपींशी संवाद..! | पुढारी

रेखा जरे हत्याकांड : वकिलांना साधायचाय आरोपींशी संवाद..!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  रेखा जरे खून खटल्याची न्यायालयीन सुनावणी सुरू झाली असून, पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी (दि.13) झालेल्या सुनावणीवेळी मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह इतर पाच आरोपींच्या वकिलांनी सुनावणीवेळी आरोपींची न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी ठेवावी, यासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. या अर्जांवर सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडण्यासाठी येत्या शनिवारी (दि.15) सुनावणी होणार आहे. रेखा जरे हत्याकांडात एकूण बारा आरोपी आहेत. यापैकी 11 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून, एक महिला आरोपी फरार आहे.

मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सहा आरोपी नाशिकच्या कारागृहात आहेत. दरम्यान, या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर सुरू आहे. खटल्यातील पहिला साक्षीदार डॉक्टर बिपीन पायघन यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया 13 जुलैला होणार होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी सुनावणीवेळी मुख्य आरोपी बाळ बोठेसह अन्य चार आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर ठेवण्याची मागणी न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे.

आरोपींची सुनावणीला ऑनलाईन उपस्थिती असते. त्यामुळे आरोपींसोबत प्रत्यक्ष संवाद करता येत नाही. नाशिकच्या कारागृहात आरोपींशी संवाद साधणे शक्य होत नाही, त्यामुळे नगरच्या न्यायालयात सुनावणी होत असताना आरोपींना प्रत्यक्ष हजर ठेवावे, असे आरोपींच्या वकिलांनी अर्जाद्वारे म्हटले आहे. या खटल्यातसरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव काम पाहत आहेत. अ‍ॅड. सचिन पटेकर फिर्यादीतर्फे सहायक म्हणून काम पाहत आहेत.

या आरोपींच्या वकिलांचा अर्ज
बाळ जगन्नाथ बोठे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे या आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केले आहेत. आरोपींना प्रत्यक्ष हजर ठेवल्यास त्यांच्याशी खटल्याबाबत इतर माहिती विचारता येईल, असे वकिलांनी अर्जात म्हटले आहे.

बाळ बोठेची ऑनलाईन उपस्थिती
जरे खून खटल्यातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची नाशिक कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी होती. तसेच, नाशिकच्या न्यायालयात असलेले इतर पाच आरोपीही ऑनलाईनच उपस्थित होते. सरकार पक्षाने 89 साक्षीदारांची यादी न्यायालयात दिली असून, त्यांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया आता पुढील तारखेपासून पूर्ववत होणार आहे.

हेही वाचा :

नाशिकमध्ये आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम

नगर : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

Back to top button