टोमॅटो खाणार आणखी दीड महिना भाव ! | पुढारी

टोमॅटो खाणार आणखी दीड महिना भाव !

ज्ञानेश्वर खुळे :

वीरगाव : पुढारी वृत्तसेवा :

एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, त्याच काळात टोमॅटोला मागणी नसल्याने शेतकर्‍यांवर पिकविलेला टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकण्याची बिकट वेळ आली होती. दर पडल्याने या पिकाकडे हैराण झालेल्या उत्पादकांनी दुर्लक्ष केल्याने आजच्या घडीला टोमॅटोची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी 15 जूनपूर्वी एप्रिल-मे महिन्यात 2 ते 3 रुपये प्रतिकिलोचा टोमॅटो आज 100 ते 130 रुपये प्रतिकिलो उच्चांकी भावात विकला जात आहे. हा किमतीचा चढता आलेख ऑगस्टपर्यंत कायम राहण्याच्या शक्यतेने आणखी काही काळ ग्राहकांना मर्यादित बाजार भावाची प्रतिक्षा राहील.

मे अखेर आणि जूनच्या पुर्वार्धात लागवड झालेला टोमॅटो 15 ऑगस्टनंतरच बाजारात येईल. तोवर आजपर्यंत कधीही न मिळालेला उच्चांकी बाजारभाव शेतकर्‍यांच्या पदरात पडेल. सर्व शेतीमाल मातीमोल ठरत असताना काही शेतकर्‍यांना टोमॅटोने मुक्तहस्ते लक्ष्मीचे वरदान दिले आहे. अर्थात शेतकर्‍यांची ही संख्या नगण्य आहे. मिळणारा पैसा दिसत असला तरी अनेकवेळा याच पिकाने दगाही दिला आहे. एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पादनास खर्च करुन एप्रिल-मे महिन्यात अनेक शेतकर्‍यांना तो खर्च मिळाला नाही.
किरकोळ बाजारात 150 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात असला तरी शेतकर्‍यांच्या पदरात 70 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने रक्कम मिळते. महिन्याभरात बाजारभाव सामान्य पातळीवर येतील, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आवक सुरु झाल्यावर दर खाली येतील, हा केंद्र सरकारचा अंदाज साफ चुकला. पुणे बाजार समितीत दररोज सरासरी 10 ते 12 हजार टन होणारी आवक सद्यस्थितीला 4 ते 5 हजार टनावर आली. नाशिक, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर येथील नदीकाठावर टोमॅटोची मोठी लागवड होते. स्थानिक गरज भागल्यानंतर मुंबई, पुणा व देशभरात उर्वरित माल पाठविला जातो. याशिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणातूनही टोमॅटोचा ओघ नियमीत सुरु असतो, परंतु टोमॅटोचे फडच कमी झाले तसेच नवीन टोमॅटो बाजारात यायला ऑगस्ट उजाडणार असल्याने बाजारभाव चढेच राहण्याची शक्यता वाटते. ऑगस्ट किंवा त्यानंतर आवक वाढून बाजारभावाची पातळी सामान्य स्तरावर येऊ शकते.

मोठ्या जिकीरीने शेतकरी दरवेळी टोमॅटोचे फंड उभे करतात, परंतु बदलते वातावरण, वाढते तापमान, मोसमी पावसाची अनियमितता, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे अनेकवेळा नुकसानीचा सामना करावा लागतो. कधी नव्हे इतके बाजारभाव टोमॅटोला सध्या मिळाल्याचे दिसत असले तरी शेतातील इतर पिकांनीही शेतकर्‍यांना अनेकदा दगा दिला. आता किरकोळ बाजारात टोमॅटो महाग वाटत असला तरी ग्राहकांनी तो विनातक्रार खरेदी करावा. कारण उत्पादकांना मोठ्या कालावधीने समाधान मिळाल्याने महाग…महाग म्हणून तक्रार करु नये.

हेही वाचा :

रस्ता ओलांडण्यासाठी फक्त 7 सेकंदांची वेळ; पुण्यातील लॉ-कॉलेज रस्ता येथील प्रकार

अजित पवारांकडेच द्यावे पालकमंत्रिपद; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Back to top button