शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत ईव्हीएम ! | पुढारी

शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत ईव्हीएम !

ढोरजळगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील नांदूरविहिरे प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक चक्क व्होटिंग मशीनवर घेण्यात आली. शाळेची 102 विद्यार्थी संख्या असून, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी तसेच हक्कांची कर्तव्याची जाणीव जागृत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापक भरत कांडेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदासाठी आठ विद्यार्थी रिंगणात होते. मतदान अधिकार्‍याची भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडली. 102 म्हणजे 100 टक्के मतदान झाले. विद्यार्थी मतदान अधिकार्‍यांनी ईव्हीएम व इतर निवडणूक साहित्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडेे जमा केले.

नंतर निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार करण्यात आला. 69 पैकी सर्वाधिक 14 मते घेत संचित वाघमारे या चौथीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्रीपदी बाजी मारली. वृषाली पालवे हिने 12 मते घेत उपमुख्यमंत्री पद पटकावले. निकाल येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पार पाडल्याचे तंत्रस्नेही शिक्षक अल्ताब बागवान यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार सुभाष बुधवंत, शहादेव वाकडे, गोपीचंद रिंधे, अर्जुन बुधवंत, नानासाहेब बडे, जालिंदर खोसे, शिक्षिका सुनिता खेडकर, वैशाली खोसे उपस्थित होते. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी पटेकर, शैलजा राऊळ, डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख गोरक्षनाथ दुसुंगे आदींनी शुभेच्छा दिल्य.

हे ही वाचा : 

प्रदीप कुरूलकर प्रकरण : भलत्याच लॅपटॉपचा अर्ज मागे

सातारा : फलटणमध्ये आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यू?

Back to top button