नगर : एक रूपयात पीकविमा हा अजेंडा ; कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे | पुढारी

नगर : एक रूपयात पीकविमा हा अजेंडा ; कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे

नगर : पुढारी वृत्तसेवा : एक रूपयात पीक विमा हा आपला अजेंडा आहे. पीक विम्यासंदर्भात राज्य शासन आपल्या पाठीशी आहे. शासन हे शेतकर्‍यांसाठी व त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असून, कृषी विभागाचा पीक विमा प्रसार प्रचार रथ गाव पातळी गेला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने आयोजित पिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) व फलोत्पादन पिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्ट सॅप) सन 2023-24 अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोराळे बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथील विशेषज्ञ डॉ.नारायण निबे, डॉ.नंदकिशोर दहातोंडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. टी. आघाव, तंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे यांच्यासह कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बोराळे म्हणाले, जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर अनेक कृषी कर्मचारी उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा. प्रश्नमंजुषासारखे खेळ घेऊन शेतकर्‍यांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करा. कृषी योजनांचे सामूहिक वाचन करा. पीएम किसानच्या माध्यमातून चांगले काम झाले असून, आपण शेतकर्‍यांची मुले आहोत. शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी आपल्याला काम करायचे आहे.

चांगले काम करणार्‍यांचे नेहमी कौतुक होते. उत्कृष्ट काम करणार्‍या दहा कृषी सहाय्यकांचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करणार असल्याचे बोराळे यांनी सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी नवले म्हणाले, महिला शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र महिला शेतीशाळा घ्या. त्या माध्यमातून त्यांना शेती व्यवसाय, तसेच कृषी योजनांची माहिती द्या. पीक विम्यासंदर्भात गाव पातळीवर प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे.

मित्रत्वाच्या भावनेने आपण सर्वांनी काम केले पाहिजे. नगर जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे. महाराष्ट्रात कसा एक नंबरवर राहील, या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र मिळून कामाच्या माध्यमातून दाखवून दिले पाहिजे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तृणधान्याचे महत्त्व पटवून देत, सोयाबीन पेरणीसाठी प्रवृत्त करा, असे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. नारायण निबे यांनी तूर व सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, डॉ. नंदकिशोर दहातोंडे यांनी हॉर्टसॅप अंतर्गत संत्रा व डाळिंब पिकावरील एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, डॉ. एस. टी. आघाव यांनी मका पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी क्रॉपसॅप अंतर्गत पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण कार्यपद्धती, कृषी पर्यवेक्षक अनिल गावखरे व जालिंदर गांगर्डे यांनी हॉर्टसॅप अंतर्गत पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण कार्य पद्धती यावर मार्गदर्शन केले.
संजय मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. तंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे यांनी आभार मानले.

हे ही वाचा :

अजित पवार-जयंत पाटील येणार आमने-सामने

गायीच्या दुधाचे दर कमी झाल्याने उत्पादकांची कोंडी

Back to top button