नगर : पारनेरच्या नगराध्यक्षपदी अडसूळ बिनविरोध | पुढारी

नगर : पारनेरच्या नगराध्यक्षपदी अडसूळ बिनविरोध

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेरच्या नगराध्यक्षपदी नितीन अडसूळ यांची बिनविरोध निवड बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार नीलेश लंके यांच्या सूचनेने नगरसेवक नितीन अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रिक्त जागेवर बुधवारी नितीन अडसूळ यांचा एकमेव अर्ज असल्याने नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी गणेश राठोड व सहायक प्रभारी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केली. नगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर विजय औटी यांनी राजीनामा दिला होता.

नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांनी बहुमत होत नसल्याने माघार घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन अडसूळ यांचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला होता. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्यासह योगेश मते, भूषण शेलार, सुरेखा भालेकर, विद्या कावरे, हिमानी नगरे, प्रियंका औटी, सुप्रिया शिंदे, नीता औटी यासोबत शिवसेनेचे नगरसेवक जायदा शेख, शालूबाई ठाणगे यांच्यासह स्विकृत नगरसेवक डॉ. सादिक राजे, शुभम देशमुख उपस्थित होते. शिवसेना नगरसेवक नवनाथ सोबले मुंबईत असल्याने ते हजर नव्हते. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे नगरसेवक युवराज पठारे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेविका नीता ठुबे, विद्या गंधाडे, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे नगरसेवक अशोक चेडे असे पाच गैरहजर होते.

नगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमय घडामोडी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे 9 नगरसेवक असून, त्यात शिवसेनेच्या 3 नगरसेवकांची भर पडली आहे. राष्ट्रवादीचे संख्या बळ 12 झाले होते. त्यामुळे एकीकडे नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस निर्माण झाली असताना राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीचे संख्याबळ 12 पोहोचल्याने विरोधकांना आमदार नीलेश लंके यांनी चेकमेट दिला होता.
खासदार सुजय विखे यांचे समर्थक नगरसेवक युवराज पठारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणुकीत रंगत आणली. मात्र, माजी आमदार विजय औटी व आमदार लंके यांनी बाजार समितीप्रमाणे नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडी माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.

पारनेरचा पाणीप्रश्न सोडविणार : नगराध्यक्ष अडसूळ
पारनेर शहरासह वाड्या-वस्त्यांचा पाणीप्रश्न प्रलंबित असून, गेल्या दीड वर्षात त्याचा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. आमदार लंके यांच्या माध्यमातून पाणीप्रश्नासह इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही नूतन नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी दिली.

नगराध्यक्षांचा युवराज पठारेंकडून सत्कार
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलेल्या युवराज पठार यांनी माघारीच्या दिवशीच नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांचा सत्कार करून आपली मैत्री दाखवून दिली.

हे ही वाचा : 

पुणे-दौंड-बारामती डेमू रद्द

पडसाद भूकंपाचे : कर्मभूमीतच शरद पवारांकडे उरला नाही शिलेदार

Back to top button