वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील वाळकी येथून दहा महिन्यांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शोध लावला आहे. तिला पळवून नेणार्या सुहास घनश्याम बोठे (वय 22, रा. वाळकी ता.नगर) यास पोलिसांनी पीडित मुलीसह पुणे जिल्ह्यातील काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. वाळकी येथील शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने दि.19 सप्टेंबर 2022 रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीचा मुंबई, पनवेल, कोल्हापूर, वसई-विरार येथे जाऊन शोध घेतला. परंतु, आरोपी व मुलगी सापडली नाही. मुलीचे आई-वडिल वारंवार तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना भेटून मुलीचा शोध घेण्याची विनंती करीत होते. परंतु, आरोपी चाणाक्ष असल्याने त्याचा मागमूस पोलिसांना लागत नव्हता.
याबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना सदर मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. देशमुख यांनी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, रणजित मारग, हवालदार सुभाष थोरात, कर्मचारी कमलेश पाथरूट, राजू खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग, नितीन शिंदे यांचे पथक तयार करून तपासकामी पाठविले. या पथकाने बदलापूर, पनवेल, मुंबई येथे जाऊन चौकशी केली.
दरम्यान, पथकाला आरोपी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व कर्मचारी राहूल गुंडू यांची मदत घेत तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपी हा काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे वास्तव्या करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने तेथे जाऊन शोध घेतला असता, आरोपी व पीडित मुलगी नाव बदलून एका शेतामध्ये कामगार म्हणून राहत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन नगरला आणले. पीडित मुलीला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी सुहास बोठे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवस पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.
हे ही वाचा :