नगर : पुरवठा निरीक्षक लाचेच्या जाळ्यात | पुढारी

नगर : पुरवठा निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्समन म्हणून काम करणार्‍याला पंधरा हजारांची लाचेची मागणी करणार्‍या पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षकावर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराने दुसर्‍या गावातील लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
विठ्ठल मच्छिंद्र काकडे (नेमणूक तहसिल कार्यालय, पारनेर) असे लाचखोर पुरवठा निरीक्षकाचे आहे.

यातील तक्रारदार हे यादववाडी (ता.पारनेर) येथील जय जवान बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्समन म्हणून, 2020 पासून काम करत आहेत. त्यांनी मागील तीन महिन्यापासून वाडेगव्हाण (ता.पारनेर) येथील लाभार्थ्यांना काम करत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप केले. त्यामुळे तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी विठ्ठल काकडे या पुरवठा निरीक्षकाने 20 हजारांची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याची तक्रार नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तहसिल कार्यालयात पडताळणी केली असता काकडे याने दि.24 मे रोजी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकरण्याची संमती दर्शविली.

पारनेर पोलिस ठाण्यात संबंधित पुरवठा निरीक्षकावर 1 जूलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस नाईक रमेश चौधरी, सचिन सुद्रुक, बाबासाहेब कराड, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा :

मुंबई : आज उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मेगा ब्‍लॉक

नाशिक : शहरातील ३३३ अपघाती स्थळांवर करणार उपाययोजना

Back to top button