अहमदनगर जिल्ह्यात 20 हजार हेक्टरवर पेरणी; सर्वाधिक पेरा कपाशीचा | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात 20 हजार हेक्टरवर पेरणी; सर्वाधिक पेरा कपाशीचा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप पेरणीला वेग आला आहे. आजमितीस जिल्ह्यात 20 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक 11 हजार 996 हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे. जून महिन्यात सरासरी 108 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 108.7 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा जून महिन्यातील पहिले 23 दिवस पावसाने दडी मारली. रोहिणी आणि मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली.

त्यामुळे पेरणी खोळंबली होती. मात्र, आर्द्रा नक्षत्राने शनिवारी जोरदार आगमन केले. शनिवारनंतरही पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 49.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या खरीप हंगामात ऊसक्षेत्राशिवाय 4 लाख 47 हजार 822 हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बाजरीसाठी सर्वाधिक एक लाख 40 हजार 812 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. आतापर्यंत या पिकाची एक हजार 739 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

त्याखालोखाल कापसाचे एक लाख 14 हजार 352 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करावयाची आहे. आतापर्यंत 11 हजार 996 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. सोयाबीनसाठी 54 हजार 294 हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत एक हजार 49 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. दीड हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. आतापर्यंत दोन हजार 484 हेक्टर तूर, 213 हेक्टर मूग तर 117 हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झालेली आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस (मि.मी.)

नगर 50.2, पारनेर 41.3, श्रीगोंदा 43.3, कर्जत 25.7, जामखेड 56.9, शेवगाव 63.5, पाथर्डी 75.5, नेवासा 71, राहुरी 33, संगमनेर 30.1, अकोले 53.4, कोपरगाव 55.2, श्रीरामपूर 32.9, राहाता 75.4.

हेही वाचा

मी तू पण गेले वाया ! पाहता पंढरीच्या राया!!

अकोले : अंबीत धरण ओव्हर फ्लो ! पाणी पिंपळगाव खांड धरणाकडे

‘भोगावती’सह 400 पेक्षा अधिक संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर

Back to top button