

आपल्या राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही प्रास्ताविकेत असणारी तत्त्वे कुठून घेतली, असे म्हटले की आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला देतो. खरे तर त्याआधीही या भूमीमध्ये या मूल्यांचा जागर होत होता. ही मूल्य रुजावीत यासाठी प्रयत्न केले जात होते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकारामांसह विविध संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये या मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याला वैचारिक अधिष्ठान निर्माण करण्याचे काम संत वाङ्मयाने केले.
संतांच्या मांदियाळीने समता, स्वातंत्र्य, बंधुता, विषमतेविरुद्ध विद्रोह, श्रमप्रतिष्ठा, मानवतावाद अशा मूल्यांचा पुरस्कार केला. संत वाङ्मय निवृत्तीपर नसून प्रवृत्ती पर आहे. आधुनिक मानवतावादाचा जयघोष या वाङ्मयमध्ये दिसतो. काही मंडळींनी संतांना टाळकुटे ठरवून संतांमुळे महाराष्ट्र प्रवृत्ती मार्ग सोडून विरक्तीकडे झुकला, अशी मते मांडलेली आहेत; पण असे नाही. आता संत साहित्याचे संशोधन करून अनेकजण नवा आशय समोर आणित आहेत. उदा.
अवघा रंग एक झाला ! रंगी रंगला श्रीरंग!!
मी तू पण गेले वाया ! पाहता पंढरीच्या राया!!
संत सोयराबाई याचा हा अभंग. या अभंगाचा आशय आणि संविधानातील कलम 17 मध्ये केलेली तरतूद याच्यात खूप साम्य आहे. कलम 17 असे सांगते की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषेध करण्यात आलेले आहे. अस्पृश्यता हा कायद्यानुसार गुन्हा आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, सामाजिक परिवर्तनासाठी संतांनी केलेले काम महत्त्वाचे आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या 16 अभंगांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. महात्मा गांधी येरवड्याच्या कारागृहात असताना त्यांनी हे भाषांतर केले. नागपूरचे डॉ. इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख या दोन लेखकांनी संपादित केलेल्या श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा या ग्रंथाला महात्मा गांधी यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यात तुकाराम मला खूप प्रिय आहेत, असे त्यांनी लिहिले आहे. महात्मा गांधी यांनी तुकारामांच्या या 16 अभंगांचा आपल्या आश्रम भजनावलीत समावेश केला होता. त्यातील एक
पुण्य पर उपकार पाप ती परपीडा!!
आणिक नाही जोडा दुजा यासी!!
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म !
आणिक हे वर्म नाही तुजे!!
असे अत्यंत आशयगर्भ असे हे अभंग आहेत.