

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी होणार्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून, त्याबाबतची अधिसूचना संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रथम वर्ष पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर मुदत वाढीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहसंचालक डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपर्यंत जवळपास 7 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा जिल्हा नोडल अधिकारी बाळासाहेब कर्डिले यांनी दिली. प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी नगर जिल्ह्यात 7 हजारांहून अधिक जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीमध्ये 433 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहेत. तसेच, कॅम्पस मुलाखतीची प्रक्रिया अजूनही सुरू असून, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला नौकरीच्या विविध संधी देत असल्याची माहिती अधिकारी बडेकर यांनी दिली.
हेही वाचा