वाळकी : अंत्यविधीसाठी होणारी पायपीट थांबणार; तीस लाखांचा निधी मंजूर | पुढारी

वाळकी : अंत्यविधीसाठी होणारी पायपीट थांबणार; तीस लाखांचा निधी मंजूर

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील वाळकी येथील वालुंबा स्मशानभूमी जवळ बंधारा उभारून पाणी अडविण्यात आले आहे. नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी राहत असल्याने भोलेनाथवाडी येथील ग्रामस्थांना अत्यंविधीसाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांनी वारंवार केलेल्या मागणीमुळे तीस लाखांचा निधी मंजूर झाला असून, नदीवर सेतू पुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंविधीसाठी ग्रामस्थांची होणारी पायपीट आता थांबणार आहे.

वाळकी आणि भोलेनाथवाडी यांच्यामधून वालुंबा नदी वाहते. पूर्वी नदीपात्र सपाट असल्याने ग्रामस्थांची वहिवाट त्यातूनच होती. वाहून जाणारे पाणी स्मशानभूमीजवळच बंधारा उभारून अडविल्याने नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी दिसत आहे. त्यातच नदीपात्राची खोली वाढविल्याने, परिसरातील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे भोलेनाथवाडी येथील ग्रामस्थांना गावात येण्यासाठी दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. अत्यंविधी, दशक्रिया विधीसाठी दोनशे मीटरवर स्मशानभूमी असताना पाण्यामुळे नागरिकांना दोन किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते.

भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे यांना नदीवर सेतू पूल उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे साकडे घातले. त्यामुळे पुलाच्या कामासाठी सुमारे तीस लाखांचा निधी उपलब्ध झाला. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यावर कठडे व हायमॅक्स दिवे बसविण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी दहा लाखांचा निधी दिला आहे. पंधरा दिवसांत पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

नदीच्या पुलावरील काँक्रिटीकरणाचा प्रारंभ भाजपाचे संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे नागरिकांनी विशेष आभार मानले. यावेळी विठ्ठल भालसिंग, पोपट बोठे, अनिल भालसिंग, गणेश भालसिंग, विठ्ठल कासार, विक्रम भालसिंग, प्रथमेश भालसिंग, सचिन बोठे, रतन भालसिंग, दादा भालसिंग आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पुलाचे महेंद्रनाथजी सेतू नामकरण

नदीवरील पुलामुळे ग्रामस्थांची गैरसोय टळणार आहे. नदीवर पुल उभारण्याची कल्पना वाळकीकरांचे दैवत सद्गुरू महेंद्रनाथ महाराज यांनी मांडली होती. मात्र, महाराज समाधिस्त झाल्यानंतर या पुलाची उभारणी झाली. त्यामुळे या पुलाचे महेंद्रनाथजी महाराज सेतू असे नामकरण करणार असल्याचे दिलीप भालसिंग यांनी सांगितले.

हेही वाचा

बोधेगाव : जायकवाडीच्या पाण्यासाठी लढा : ऋषिकेश ढाकणे

पुणे : कैद्यांना स्मार्टकार्ड फोनद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद

बोधेगाव : जायकवाडीच्या पाण्यासाठी लढा : ऋषिकेश ढाकणे

Back to top button